मुंबई,दि.२१: Anil Deshmukh On BJP: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप अनिल देशमुखांवर आहे. १०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी त्यांना जेलवारीही झाली होती. आता याप्रकरणात अनिल देशमुख यांनी मोठा आरोप केला आहे. भाजपाला लक्ष्य करत त्यांनी आरोप केला आहे.
अनिल देशमुख यांचा भाजपावर गंभीर आरोप | Anil Deshmukh On BJP
“भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा समझोता करण्यासाठी दबाव होता. समझोता करण्यास नकार दिला, त्यामुळे परमवीर सिंह यांना माझ्यावर खोटे आरोप करायला लावले आणि माझ्यावर कारवाई करायला लावली, हे शंभर टक्के खरे आहे. ज्या पद्धतीने माझ्यावर दबाव होता, मी सरळ सांगितलं की मी कोणत्याही पद्धतीने समझोता करणार नाही आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्यावर रेड पडली. आणि माझ्यावर कारवाई करण्यात आली, ही वस्तुस्थिती आहे”, अशी धक्कादायक माहिती अनिल देशमुखांनी आज दिली. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
काय आहे प्रकरण?
अनिल देशमुख यांच्यावर गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये २०२२च्या जून महिन्यात सीबीआयने अनिल देशमुख यांच्याबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे, संदीप पलांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.
अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. परमबीर सिंह यांनीच हे आरोप केले आहेत. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईला सुरुवात केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, बडतर्फ करण्यात आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने बार सुरळीत चालवण्यासाठी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून ४.७ कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला है पैसे सोपवले.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या तपासात असे समोर आले आहे की हवाला चॅनेलद्वारे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते, जे बनावट कंपन्या चालवत होते. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, सुरुवातीला हा गैरव्यवहाराचा आकडा १०० कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, पुढे हा आकडा कमी कमी होत गेला. “अनिल देशमुख यांनी सचिन वझेमार्फत मुंबईतील बार मालकांकडून ४ कोटी ७० लाख रुपये खंडणी वसूल केली. यानंतर हे पैसे बेकायदेशीर मार्गाने नागपूरच्या श्री साई शिक्षण संस्थेत पाठवले. या शिक्षण संस्थेवर अनिल देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांचं नियंत्रण आहे,” असा आरोप ईडीने अनिल देशमुखांवर केला होता. या प्रकरणी अनिल देशमुख वर्षभर तुरुंगातही होते.