गुहागर, दि.15: ठाकरे गटाचे नेते अनंत गिते (Anant Geete) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत तर अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच शिवसेना पक्ष असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.
राष्ट्रवादी पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यात पक्ष व चिन्हावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत. शरद पवारांच्या घरातूनच बंड झाल्यामुळे हा मोठा धक्का मानला जात आहे. अशात अनंत गिते यांनी शरद पवार यांचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला आहे.
‘मी भाग्यवान आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच लोकसभेच्या उमेदवारीची उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस केली आहे. सुनील तटकरेंना गाडायचं आहे. सुनील तटकरे यांनी माझं घर फोडलं. त्यामुळे मला तटकरेंना गाडायचं आहे, असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं असून त्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे माझ्या नावाची शिफारस केली आहे,’ असा खळबळजनक दावा अनंत गिते यांनी केला आहे. tv9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.
tv9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार अनंत गिते हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला. यावेळी गिते यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिनाभरात राजीनामा देणार आहेत. त्यांचे 16 आमदार अपात्र होतील. निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे. आपलेच दिवस परत येणार आहेत, असं अनंत गिते यांनी म्हटलं आहे. गिते यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गलिच्छ झालं आहे. एका माणसाच्या हट्टासाठी आमदार फुटले. मी पुन्हा येईन, पुन्हा येईनसाठी नीच राजकारण केलं गेलं. त्याची शिकार ही एकट्या शिवसेनेची नाही. भाजपचे 105 आमदार होते. 40 फोडले, तरीही त्यांची भूक भागेना झालीय. भाजपला भस्म्या रोग झाला आहे. यांना राज्यही हवंय आणि केंद्रही हवंय. आता भाजप घरे फोडायला निघाली आहे, असा हल्लाच गिते यांनी चढवला आहे.