केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा, पेट्रोल आणि डिझेल होणार स्वस्त

0

नवी दिल्ली,दि.२१: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या उत्पादनांवरील अबकारी कर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत असताना देशातील जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली. ही माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहेत.याशिवाय, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ९ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (१२ सिलेंडरपर्यंत) २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, यामुळे आपल्या माता-भगिनींना मदत होईल.

७ एप्रिलपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मात्र, गेल्या २२ मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत पेट्रोल डिझेलच्या दरात १० रुपये प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. यामुळे महागाई देखील वाढू लागली आहे. दुधापासुन सर्व पदार्थांच्या दरात, भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता होती.

एकामागून एक केलेल्या १२ ट्विटमध्ये अर्थमंत्र्यांनी अनेक उत्पादनांवरील अबकारी, कस्टम, आयात आणि निर्यात शुल्क कमी करण्याबाबत माहिती दिली आहे. “आमची आयात अवलंबित्व जास्त असलेल्या प्लास्टिक उत्पादनांसाठी आम्ही कच्चा माल आणि मध्यस्थांवर सीमाशुल्क देखील कमी करत आहोत. यामुळे अंतिम उत्पादनांची किंमत कमी होईल. त्याचप्रमाणे आम्ही कच्चा माल आणि मध्यस्थ यांच्या किंमती कमी करण्यासाठी लोखंड आणि पोलाद यांच्यावरील सीमाशुल्क कमी करत आहोत. काही स्टील कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी केले जाईल. मात्र, काही पोलाद उत्पादनांवर निर्यात शुल्क आकारण्यात येणार आहे,” असे सीतारमण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here