मुंबई,दि.25: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची ॲाडिओ क्लिप समोर आली आहे. आगामी निवडणुकीच्या (Mission Election) पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहायला हवं. विशेषतः पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना ढाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. याबाबतची ऑडिओ क्लिप समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून तत्पूर्वी त्यांनी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकले. बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात महाविजय 2024 विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बुथरचना आणि पदाधिकाऱ्यांनी (BJP) सांभाळायच्या जबाबदाऱ्या या विषयावर बावनकुळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल आहे. याच बैठकीत त्यांनी पत्रकारांना (Journalist) चहा प्यायला घेऊन जा, अशा प्रकारचे वक्तव्य केलं आहे. याबाबतची ऑडिओ क्लिप समोर आली असून माध्यमांना बैठकीला परवानगी नसल्याने व्हिडीओ उपलब्ध होऊ शकला नाही, मात्र या ऑडिओ क्लिपमुळे पत्रकारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची ॲाडिओ क्लिप आली समोर
बावनकुळे यावेळी म्हणाले की, ज्या बुथवर तुम्ही काम कराल, तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले (Electronic Media) कोण आहेत, पोर्टल वाले कोण आहेत, प्रिंट मीडियावाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतो, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत, त्यांची यादी तयार करा, आपल्या बुथवर निगेटिव्हिटी होऊ द्यायची नाही, आपल्याविरुद्ध लिहू नये, विरोधात काही येणार नाही, याची काळजी घ्या, यात एक-दोन पोर्टल वाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, हे समजलं असेल, त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच, अशी इशारा वजा सूचना देखील पदाधिकाऱ्यांना दिली. मिशन महाविजय 2024 पर्यंत बुथ संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही, याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत याची काळजी घ्या, असा सल्लाही बावनकुळे यांनी यावेळी संवाद बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिला.