अमोल शिंदे यांची पुरुषोत्तम बरडे यांच्यावर टीका; स्वतःचे हिंदुत्व तपासा मग माझ्या नेत्याची हिम्मत काढा

0

सोलापूर,दि.३: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान दिले होते. ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिम्मत काढत जर खरेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे हिंदुत्ववादी असेल तर औरंगाबाद मधील औरंगजेब यांची कबर पाडून त्याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक बांधावे असे आवाहन बरडे यांनी केले आहे.

सोलापुरात सध्या हा वाद पेटला असून शिंदे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी बरडे यांच्यावर टीका केली आहे. अमोल शिंदे म्हणाले, ठाकरे शिवसेना गटाचे हिंदुत्व संपलेले आहे. मागील साडे सात वर्षात पहिले पाच वर्षे फडणवीस-ठाकरे सरकार होते, नंतर अडीच वर्षे सोनिया-पवार-ठाकरे सरकार होते. तेव्हा तुम्ही ही बोलण्याची हिम्मत दाखवायला पाहिजे होती. तेव्हा तुमच्यातील शिवसैनिक जिवंत दिसला असता. तुमच्याकडे हिंदुत्ववादी माणसे राहिली नाहीत आणि सेक्युलर लोक तुम्हाला स्वीकारायला तयार नाहीत असा टोला अमोल शिंदे यांनी हाणला.

मुख्यमंत्र्याबद्दल बोलण्याची हिम्मत कृपया करू नये, अन्यथा तुमची हिम्मत किती आहे ती काढावी लागेल असा इशारा अमोल शिंदे यांनी दिला. महाराष्ट्रात औरंगजेब आणि अफ़जल खान यांच्या कबरी या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे प्रतीक आहेत, अशा विषयाला हात घालून जाणीवपूर्वक राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे शिंदे म्हणाले. अमोल शिंदे यांनी ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे यांना छेडल्याने आता यावर ते काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here