सोलापूर,दि.14: सोलापूर शहरात शिवजयंती मिरवणूक पहायला येणाऱ्या नागरिकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अमोल शिंदे (Amol Shinde) यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे. बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी अकरा हजार शिव भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
गैरसोय होऊ नये यासाठी भोजनाची व्यवस्था | Amol Shinde
शिवजयंती सोलापूर शहरात मोठ्या उत्साही वातावरणात साजरी केली जाते. सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातून अनेकजण मिरवणूक पाहण्यासाठी येतात. येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पोटभर जेवण देऊन शिवप्रेमींना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मंगळवेढा तालमीच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित केला जातो.
7000 शिवप्रेमींनी या शिव भोजनाचा आस्वाद घेतला होता | मंगळवेढा तालीम
गेली दोन वर्ष कोरोनामुळे हा उपक्रम राबवला गेला नाही मात्र यापूर्वी घेतलेल्या उपक्रमामध्ये 7000 शिवप्रेमींनी या शिव भोजनाचा आस्वाद घेतला होता. यंदाच्या वर्षी मिळणारा प्रतिसाद आणि होणारी गर्दी लक्षात घेऊन 11000 शिवभक्तांना आणि शिवप्रेमींना तसेच बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांना भोजन शिव भोजन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथे बाजीआण्णा मठाजवळ शिवभोजन देण्यात येणार आहे. तरी सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहान अमोल शिंदे यांनी केले आहे.
शिवभोजनाच्या उपक्रमाचे उद्घाटन बाळासाहेबांची शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार प्रणिती शिंदे, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त शितल तेली उगले, माजी महापौर महेश कोठे, पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे या प्रमुख तसेच शहर जिल्ह्यातील नेते मंडळींच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेस सागर पिसे, हर्षल वाघमोडे, किरण सिंह चव्हाण, अमित पवार व विभुते यांच्यासह मंगळवेढा तालमीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.