मोहित कंबोज कुणाच्या चड्डीची नाडा आहे हे सर्वांना माहीत आहे: अमोल मिटकरी

0

मुंबई,दि.17: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोहित कंबोज यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी खळबळजनक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये लवकरच राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगात जाणार आहे, असे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेते लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. संबंधित ट्वीट जतन करून ठेवा, असा विश्वासही त्यांनी ट्वीटमधून व्यक्त केला आहे. या ट्वीटमुळे अनेकांनी मोहित कंबोज यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आत्तापर्यंतच्या ईडी, सीबीआय कारवाई होण्याअगोदर भाजपा नेते किरीट सोमय्या हे सातत्याने पत्रकार परिषदेत नावे जाहीर करत होते. त्या नेत्यावर लगेच कारवाई होत होती.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर मोठे गंभीर आरोप करत घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. आताच्या घडीला अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू असून, पुढचा नंबर अनिल परबांचा असल्याचे सांगितले जात आहे.

भाजप नेते मोहित कंबोज हे नेहमीच ईडीच्या कारवाईसंदर्भात ट्विट करत असतात. ईडीच्या कारवाई होण्यापूर्वीच ते पुढचा नंबर कोणाचा याचं भाकीतही वर्तवितात, विशेष म्हणजे अनेकदा मोहित कंबोजने वर्तवलेलं भाकीत खरंही ठरलं आहे. त्यावरुनच, आता विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत.

मोहित कंबोज यांच्या ट्विटवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, मोहित कंबोज कुणाच्या चड्डीचा नाडा आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, कंबोजला ईडीच्या कारवाईपूर्वीच माहिती कशी मिळते, हे संशयास्पद आहे, असे मिटकरी यांनी म्हटलं आहे.

मोहित कंबोजने ट्विट करुन अनिल देशमुख यांच्यानंतर कोणाचा नंबर हे सांगितलंय, यासंदर्भात मिटकरी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मोहित कंबोज आहे कोण? त्याला इतकं महत्त्व भेटतं, मी स्पष्ट सांगतो. लष्कर ए देवेंद्रमधला तिसऱ्या फळीतला हा नेता आहे.

हा भाजपचा भोंगा आहे, याने कालपरवा भोंगे वाटले. मोहित कंबोजने ईडीच्या दारात बसून ही माहिती मिळवली आहे का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला आहे.

मोहित कंबोज जीएसटीवर बोलत नाही, तो शेतकऱ्यांवर बोलत नाही, तो महिलांवरील अत्याचारासंदर्भात बोलत नाही. पण, ईडी कोणाच्याघरी कशीकशी धाड टाकेल हे मोहित कंबोज ट्विट करुन सांगत असेल तर निश्चितच हे संशयास्पद आहे.

मोहित कंबोजला ही माहिती मिळतेच कशी?. मोहित कंबोज हा कोणाचा माणूस आहे, कोणाच्या चड्डीचा नाडा आहे हे सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे, असा सवालही मिटकरी यांनी विचारला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here