सांगली,दि.27: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य केलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार हे भाजपसोबत गेल्यास त्यांनाही मुख्यमंत्रीपद मिळू शकते असाही अंदाज बांधला जात आहे. दुसरीकडे राज्यात मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
जयंत पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत | Amol Kolhe
राज्यात मविआची सत्ता आल्यास सध्या तरी अजित पवार हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव देखील समोर आलं आहे. जयंत पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
अमोल कोल्हे काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील, असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. ते सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात बोलत होते.
अजित पवार यांच्या नावाची चर्चा
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार जर भाजपसोबत गेले तर त्यांना मुख्यमंत्रिपद देखील मिळू शकते अशीही चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यात पुन्हा मविआची सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे, अशा स्थितीमध्ये आता अजित पवारांच्या भूमिकेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.