Ambadas Danve | असं षडयंत्र करणं भाजपाची परंपरा बनलं आहे: अंबादास दानवे

0

मुंबई,दि.२४: Ambadas Danve On Devendra Fadnavis: षडयंत्र करणं भाजपाची परंपरा बनलं आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यावर आता राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. महाविकासआघाडीतील घटकपक्ष शिवसेनेकडून (ठाकरे गट) यावर पहिली प्रतिक्रिया आली आहे. अंबादास दानवे यांनी फडणवीसांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं. ते मंगळवारी (२४ जानेवारी) एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

भाजपाने ईडी, सीबीआयचा वापर करून…

अंबादास दानवे म्हणाले, “भाजपाने ईडी, सीबीआयचा वापर करून मुद्दाम महाविकासआघाडीच्या नेत्यांना सातत्याने लक्ष्य केलं. संजय राऊत, अनिल देशमुख यांची उदाहरणं समोर आहेत. हसन मुश्रीफ, अनिल परब यांनाही तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”

अशाप्रकारचे षडयंत्र करण्याचं काम भाजपाचं

“हे भाजपाने दिलेल्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे आहे. त्यामुळे अशाप्रकारचे षडयंत्र करण्याचं काम भाजपाचं आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांनी असा आरोप करणं चुकीचं आहे. खरं तर असं षडयंत्र करणं भाजपाची परंपरा बनलं आहे,” असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

उद्धव ठाकरे आणि तुमच्यात खूपच कटुता आली असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझ्याकडून कुठलंही वैर नव्हतं, पण मातोश्रीचे दरवाजे मला उद्धव ठाकरेंनी बंद केले. पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो तरीही ते असं वागले. एवढंच नाही तर मी तुम्हाला हे सांगतो की मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही.मात्र अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांना दिलं होतं.”

त्यामुळे मला संजय पांडे अडकवू शकले नाहीत

“मी काहीही केलं नव्हतं त्यामुळे मला संजय पांडे अडकवू शकले नाहीत. मला तुरुंगात टाकण्याचे कुठलेही प्रयत्न सफल झाले नाहीत. महाविकास आघाडीमध्ये संजय पांडे यांना टार्गेट देण्यात आलं होतं. मात्र माझ्या विरोधात त्यांना काहीही सापडलं नाही. माझ्याकडून कुठलीही कटुता आजही नाही. राजकीय दृष्ट्या मी त्यांचा (उद्धव ठाकरे) विरोधक आहे, पण व्यक्तिगत पातळीवर काहीही वैर नाही,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here