खळबळजनक वक्तव्यानंतर अजित पवार रोहित पवार यांच्याशी बोलणार

0

मुंबई,दि.18: खळबळजनक वक्तव्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याशी बोलणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केले होते. शिवसेना पक्ष फोडल्यानंतर आता विरोधकांचं पुढचं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पवार कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप पवार कुटुंबातील सदस्य आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला. रोहित पवार यांच्या या आरोपांवर आता खुद्द अजित पवार यांनाच स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.

काहीतरी गैरसमज झाला असेल. रोहित पवार असं बोलूच शकत नाही. तसं काही असेल तर त्यांना मी दुरुस्त करायला सांगतो. रोहितशी बोलावं लागेल, त्याने नेमकं कशामुळे हे वक्तव्य केलं ते पाहावं लागेल. अनेकवेळा माध्यमांमध्ये वक्तव्याचा विपर्यास होतो, असं अजित पवार म्हणाले.

रोहित पवार काय म्हणाले होते?

शिवसेनेनंतर आता विरोधकांचा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा डाव आहे. पवार कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण काहीही झालं तरी आमच्यात फूट पडणार नाही. सुप्रिया सुळे केंद्रात तर अजित पवार आणि आम्ही राज्यात आहोत, त्यामुळे संघर्ष होण्याचं कारण नाही, असं विधान रोहित पवार यांनी केलं होतं.

एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार आणि मंत्री शंभुराज देसाई यांनीही काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचं खळबळजनक विधान केलं होतं. शंभुराज देसाई यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here