कारखाने व बँका काय मी किंवा शरद पवार यांनी येऊन चालवायच्या का?: अजित पवार

0

मोहोळ,दि.१ मे: मिळालेल्या सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी करण्याची भूमिका ठेवून शरद पवार (Sharad Pawar) व राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी करत करत आहेत. जिथं जिथं शक्य, तिथे मदत या भूमिकेतून साखर कारखान्यांना सहकार्य केले असून १ मे पासून गाळप येणाऱ्या ऊसासाठी व वाहतुकीसाठी कारखान्याला अनुदान देण्यात येईल. यासह प्रत्येक नेत्यांनी कारखाने व बँका चांगल्या चालविल्या पाहिजे, त्या काय मी किंवा शरद पवार (Sharad Pawar) यांनी येऊन चालवायच्या का? असा सवाल करीत आम्ही पुणे जिल्हा मध्य.बँक चांगली चालवू शकतो? तर सोलापूरची बँक का चालू शकत नाही? ती कुणामूळे अडचणीत आली? त्यात संचालकांची चूक आहे, तुम्हाला तिथे विश्वस्त म्हणून पाठवले होते, मालक म्हणून नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी हे महाविकास आघाडीचे सरकार असल्याचे सांगितले.

अनगर (ता. मोहोळ) दि.३० एप्रिल रोजी अनगर नगरपंचायत स्थापने निमित्त कृतज्ञता व भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार बबन शिंदे, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार राहुल पाटील, आमदार निलेश लंके, संयोजक माजी आमदार राजन पाटील, आ. संजय शिंदे, दीपक साळुंखे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आ. यशवंत माने, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, माजी पं. स. सदस्य अजिंक्यराणा पाटील आदि उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, आष्टी तलावातून उपसा सिंचन करून सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला दोन कॅनाल करून मोहोळ तालुक्यातील पाण्यापासून वंचित उर्वरित भागाला पाणी देण्यासाठी प्रयत्न करू, यासह सध्या असलेले पाण्याचे आरक्षण बघून त्यांच्या तोंडातील घास न काढता आणि पाणी कमी न करता कसे देता येईल या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठक घेऊन विषय मार्गी लावू. मोहोळ नगरपरिषद आणि अनगर नगरपंचायतीच्या नवीन इमारती साठी सुरुवातीला ५ कोटी रुपये देतो आणि ३१ मार्च पर्यंत खर्च केले तर उर्वरित रक्कम देतो. राज्यात शेतकरी हिताचे सरकार आहे. दि. १ मे पासून जे जे कारखाने ऊस गाळपास आणतील, त्यांना साखर उताऱ्याच्या नुकसानीपोटी प्रतिटन २०० रुपये तर ५० कि.मी पेक्षा जास्त वाहतूक झाली तर ५ रुपये प्रति कि.मी. अनुदान देण्यात येईल. सोलापूर जिल्ह्यात ऊसाचे एक टिपरु सुद्धा राहू देणार नाही. मोहोळ तालुक्यातील महाडिक यांच्या भीमा कारखाना, कल्याणराव काळे यांचा कारखाना यांनाही मदत केली याचा आवर्जून उल्लेख करता त्यांनी राज ठाकरे, नवनीत राणा यांच्याबद्दल राज्यातील वातावरण दूषित करू नका, असा सल्लाही त्यांनी शेवटी बोलताना दिला.

माजी आमदार राजन पाटील यांनी प्रास्ताविक करताना अनगर नगरपंचायती साठी विकास निधी, तालुक्यातील पाण्यापासून वंचित राहिलेल्या उत्तर भागातील लोकांसाठी उपसा सिंचन योजनेला लवकर मान्यता मिळावी. अनगरमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालय यालाही मान्यता मिळावी अशा विविध मागण्या केल्या.

या मेळाव्यास माजी महापौर महेश कोठे, मनोहर सपाटे, रूपालीताई चाकणकर, बळीराम साठे, आ. यशवंत माने आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी ता. अध्यक्ष प्रकाश चवरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर चवरे, रामदास चवरे, हेमंत गरड, सज्जन पाटील, भारत सुतकर, विजय कोकाटे, यशोदा कांबळे, सिंधुताई वाघमारे, महेंद्र वाघमारे, बाप्पा पोटरे अक्षय खताळ आदींसह मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

राजन पाटील यांना संधी देणार

दरम्यान माजी आ. राजन पाटील यांच्याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, आरक्षणामुळे विधानसभेवर संधी देता आली नाही, म्हणून मी पुढील आठवड्यात खा. शरद पवार यांच्याशी बोलून त्यांना आणखी काही वेगळी संधी देता येते याचा प्रयत्न करणार आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी म्हणतानाच उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here