मुंबई,दि.१४: शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं रविवारी पहाटे अपघाती निधन झालं. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर विनायक मेटेंच्या कारला भीषण अपघात झाला. यामध्ये विनायक मेटेंच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना कामोठेतील एमजीएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. विनायक मेटेंच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे.
अपघात झाल्यानंतर मराठा ठोक क्रांती मोर्चाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. असे असताना राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ड्रायव्हरला डुलकी लागली असावी, त्यातून अपघाताची शक्यता व्यक्त केली आहे.
राजकीय नेत्यांना अनेकदा रात्री अपरात्री प्रवास करावा लागतो. दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचे असल्याने ते टाळता येत नाही. विनायक मेटे मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मुंबईला निघाले होते. रात्रीची वेळ होती, रात्रभर प्रवास करून येत असताना ड्रायव्हरला डुलकी लागली असावी, त्यातून अपघात झाला असावा, अशी शक्यता अजित पवारांनी व्यक्त केली आहे.
चार दिवसांपूर्वीच मेटे मला भेटले होते. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थिती, मराठा आरक्षण यावर आमची बराच वेळ चर्चा झाली. मराठा समाजाचेच नाही तर राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, असे अजित पवार म्हणाले.
“प्रवासात रात्रभर चालक जागा होता. त्यात चालकाला डुलकी लागली असावी आणि त्यातून हा अपघात झाला असेल. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यातून अजून चित्र स्पष्ट होईल. कारण हे सगळं कंटेनरच्या संदर्भातलं आहे. कंटेनरचा वेग आणि कारचा वेग किती असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे”, असं देखील अजित पवारांनी नमूद केलं.