Ajit Pawar On Shinde Group Advertisement: शिंदे गटाच्या नव्या जाहिरातीवरून अजित पवार म्हणाले…

0

मुंबई,दि.१४: Ajit Pawar On Shinde Group Advertisement: शिंदे गटाच्या नव्या जाहिरातीवरून अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. “राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” अशा मथळ्याखाली शिवसेनेच्या शिंदे गटाने मंगळवारी (१३ जून) एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीमुळे राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला असतानाच आज शिंदे गटाने आणखी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नव्या जाहिरातीद्वारे शिंदे गटाने चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. कालच्या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो नसल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. तर आजच्या जाहिरातीत शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे, दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गटातील नऊ मंत्र्यांचे फोटो छापले आहेत. चर्चा, आरोप-प्रत्यारोप थांबवण्यासाठी शिंदे गटाने ही जाहिरात प्रसिद्ध केली असली तरी यावरूनही टीका सुरू आहे.

अजित पवार काय म्हणाले? | Ajit Pawar On Shinde Group Advertisement

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेवून शिंदे गटावर सडकून टीका केली. अजित पवार म्हणाले, जाहिरातीत खाली नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे. मग भाजपाच्या मंत्र्यांचे फोटो का नाही टाकले? नऊ जणांची माळ लावली आहे. पण त्यातल्या पाच मंत्र्यांबद्दल सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर, राजकीय पक्षाचे लोक किंवा मीडिया प्रश्न उपस्थित करत आहेत. ते वादग्रस्त मंत्री आहेत. या वादग्रस्त मंत्र्यांविषयी दोन दिवसांपासून माध्यमांवर सातत्याने बातम्या येत आहेत. वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय का? असा संतप्त प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नांची शिंदे गटाने उत्तरं दिली पाहिजेत असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

अजित पवार म्हणाले, कालच्या जाहिरातीबद्दल आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यायला हवी होती, तीदेखील त्यांनी दिलेली नाहीत. त्यांनी (भाजपाने) मागच्या वेळी (२०१४ ची विधानसभा निवडणूक, २०१९ ची निवडणूक) ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ ही घोषणा दिली होती. परंतु त्या घोषणेचं काय झालं? याबद्दल कुठंच काही उल्लेख करायला ते तयार नाहीत, अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here