अजित पवार यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांबाबत केला गौप्यस्फोट

0

मुंबई,दि.१: अजित पवार यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांबाबत गौप्यस्फोट केला आहे. भाजपासोबत जाण्याचे ठरले होते, शरद पवार यांना ते माहिती होते. तर, सुप्रिया सुळेही या बैठकीला हजर होत्या, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. शरद पवार यांनी राजकारण करू नये. त्यांनी घरी बसावं यासाठी अजित पवार गटाला भाजपकडून सुपारी मिळाली आहे. अनिल देशमुख यांना जसा त्रास झाला, तसा त्रास आपल्याला होऊ नये म्हणूनच आमचे सहकारी राष्ट्रवादीतून बाहेर पडले, असा दावा अनिल देशमुख यांनी गुरुवारी केला होता. तसेच, राष्ट्रवादीत दोन गट पडले असता अनिल देशमुख यांनी आपण भाजपासोबत जाणार नाही, पवारसाहेबांसोबतच असल्याचं देशमुख यांनी म्हटलं होतं. मात्र, अनिल देशमुख यांच्याबद्दल अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने कर्जत येथे दोन दिवसीय शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरातील भाषणानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट केले. राष्ट्रवादीने वरिष्ठांच्या सांगण्यावरुन २०१४ मध्ये ज्या पक्षाला बाहेरुन पाठिंबा जाहीर केला तो पक्ष भाजप होता. आताही, भाजपासोबत जाण्याचे ठरले होते, शरद पवार यांना ते माहिती होते. तर, सुप्रिया सुळेही या बैठकीला हजर होत्या, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. यावेळी, अनिल देशमुख यांच्या भूमिकेबद्दलही त्यांनी महत्त्वाची माहिती जाहीर केली.

अनिल देशमुख माझ्यासोबत सगळ्या बैठकांना हजर होते. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होत असताना आमच्याकडून अनिल देशमुख यांचाही मंत्रीपदाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, भाजपने अनिल देशमुखांच्या मंत्रीपदाला नकार दिला. अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करुन, त्यांच्याबद्दल सभागृहातही आवाज उठवला होता. त्यामुळेच, भाजपने त्यांच्या मंत्रीपदासाठी स्पष्ट नकार दिला. त्यावेळी, मला मंत्रीपद नाही, तर मी तुमच्यासोबत नाही, असे म्हणत अनिल देशमुख यांनी दुसऱ्या गटासोबत जाणं ठरवलं, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.  

लोकसभेच्या ४ जागा लढवणारच

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मीडिया आणि पेपरमध्ये येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू झालीय. परंतु ५ राज्यांच्या निवडणूक निकालानंतर पुन्हा चर्चा होईल. आपण आपल्याकडे असणाऱ्या ४ जागा लढवणारच आहोत त्यासोबत अन्य जागांवरही निवडणूक लढवू असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला. अजित पवार यांनी राष्ट्रवादी एकत्र असतानाचा घडलेला किस्सा सांगत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शब्द पाळला नसल्याचे म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here