मुंबई,दि.25: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या वक्तव्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितीन गडकरी यांनी राजकारणातून संन्यास घ्यावासा वाटत असल्याचं वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. आपण राजकारण कधी सोडतोय असं वाटू लागल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना केलं. नितीन गडकरींच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर भाष्य केलं आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले होते
“राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? हे समजून घेतलं पाहिजे. महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झालं त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होतं. पण आता 100 टक्के सत्ताकारण झालं आहे,” असं नितीन गडकरी म्हणाले. नागपुरातील ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.
“मला खूप वेळा राजकारण सोडावं असं वाटतं, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत,” अशी भावनाही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
“माणसाच्या मोठेपणाचा, कर्तृत्वाचा आणि गुणवत्तेचा त्याच्या निवडून येण्याच्या गुणवत्तेशी काही संबंध नाही. जो निवडून येतो तोच सिकंदर अशी आपल्या समाजात भावना आहे. निवडून येणाऱ्या लोकांबद्दल मला फार काही बोलायचं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येत असतात. राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं,” असंही गडकरी म्हणाले.
अजित पवार यांची प्रतिक्रिया
“नितीन गडकरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. मंत्री म्हणून ते फार लोकप्रिय आहेत. त्यांचा अनुभव फार मोठा आहे. सत्ताधारी पक्षात असतानाही त्यांच्या मनात अशी भावना येते, ही महाराष्ट्राच्या, देशाच्या जनतेने विचार करण्याची बाब आहे,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.