मुंबई,दि.१२: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपाबरोबर जाणार असल्याचं ट्वीट केलं आहे. या ट्वीटनंतर चर्चांना उधाण आलं. आता दमानियांच्या दाव्यावर प्रश्न विचारला असता अजित पवारांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (१२ एप्रिल) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बोलत होते.
अजित पवार म्हणाले… | Ajit Pawar On Anjali Damania
भाजपाबरोबर जाणार या अंजली दमानियांच्या दाव्यावर अजित पवार म्हणाले, “एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे.”

जरंडेश्वर कारखाना प्रकरणात ईडीने क्लीनचिट दिल्याच्या वृत्तावर अजित पवार म्हणाले, “मला आणि सुनेत्रा पवार यांना जरंडेश्वर कारखाना प्रकरणात ईडीकडून क्लीनचिट मिळाल्याच्या बातमीत अजिबात तथ्य नाही. ती चौकशी सुरू आहे. त्यात कुठल्याही प्रकारची क्लीनचिट मिळालेली नाही. ही बातमी कशाच्या आधारे दिली हे मला कळायला मार्ग नाही, पण मी सर्वांना स्पष्ट सांगू इच्छितो की, अशाप्रकारची क्लीनचिट मिळालेली नाही.”
अंजली दमानिया यांचे ट्विट
अंजली दमानियांनी हा दावा करताना मंत्रालयातील एका घटनेचा संदर्भ दिला होता. अंजली दमानिया म्हणाल्या, “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्दशा होतेय ते बघू.”