मुंबई,दि.15: Ajit Pawar Meets Sharad Pawar: अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनीही शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडत मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर तब्बल 13 दिवसांनी मंत्र्यांचं खातेवाटप झालं. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Crisis) फूट पडल्यानंतर शुक्रवारी अजित पवार यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी रात्री त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेटण्यासाठी आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर काही तासांनी अजित पवार सिल्वर ओकवर दाखल झाले होते.
अजित पवार सिल्व्हर ओकवर | Ajit Pawar Meets Sharad Pawar
काल शिंदे-फडणवीस-पवार सरकारचं अधिकृतपणे खातेवाटप जाहीर झालं आणि त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकला भेट दिली. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. पण अखेर कारण समोर आलं. अजित पवार सिल्वर ओकवर काकू प्रतिभा पवार यांना भेटण्यासाठी दाखल झाले होते.
शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हातावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना भेटण्यासाठीच काल (शुक्रवारी) अजित पवार सिल्वर ओकवर दाखल झाले होते. काकू प्रतिभा पवार यांच्या हाताच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी अजित पवार सिल्व्हर ओकवर गेल्याची अधिकृत माहिती मिळाली. तब्बल अर्धा तासाच्या भेटीनंतर अजित पवार सिल्व्हर ओकवरुन बाहेर पडले.
यापूर्वी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिभा पवार यांच्या प्रकृतीबाबत बोलताना, मी त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करतो आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांना शुभेच्छा देण्याची विनंती करतो, असं म्हणाले होते.
दरम्यान, 2 जुलैला अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपची कास धरली आणि उपमुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले. त्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाल्याचं बोललं जात आहे.