मुंबई,दि.23: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानामुळे अजित पवार गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार का? अशी चर्चा सुरू होती. अमोल मिटकरी यांच्या विधानावर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकूर यांनी वंचितची भूमिका स्पष्ट केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील महायुतीच्या अपयशाचे खापर अजित पवार गटावर फोडण्यात आले.
भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी अजित पवार गटाचा महायुतीला फायदा झाला नाही, तसेच अजित पवार गटाबरोबर युती करायची गरज नव्हती अशी वक्तव्य केली. यामुळे अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार का? अशी चर्चा सुरू होती. अशातच आमदार अमोल मिटकरी यांनी प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार हे दोघे एकत्र आले तर महाराष्ट्रातील चित्र बदलेल अशी भूमिका मांडली. यावर रेखा ठाकूर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
रेखा ठाकूर म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडी आणि अजित पवार गट एकत्र येण्याबाबत विधान अमोल मिटकरींनी केले. अजित पवार आणि त्यांचा पक्ष भाजपासोबत आहे. या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी युतीबाबत विचार करू शकणार नाही. जोपर्यंत अजित पवार गटानं भाजपासोबत संबंध तोडला नाही, कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाजपाशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे त्यामुळे या विधानाचा आता काही विचार करता येणार नाही असं सांगत रेखा ठाकूर यांनी तूर्तास तरी युतीच्या चर्चेवर पूर्णविराम दिला आहे. दैनिक लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.
अमोल मिटकरी म्हणाले होते…
जर महायुतीत 50-55 जागांवर राष्ट्रवादीची बोळवण होणार असेल तर स्वतंत्र लढण्याची भूमिका पक्ष घेऊ शकतो. हा निर्णय वरिष्ठ पातळीवरचा आहे. पण अजित पवार एकटेच आहेत आणि एकटेच लढतील असं मित्रपक्षांनी समजू नये. राजकारणात काहीही होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून मी प्रकाश आंबेडकरांना नेहमीच आदर्श मानत आलोय. राजकारणात अजित पवार आदर्श आहेत. भलेही मी वंचित बहुजन आघाडीचा नाही. पण बाबासाहेबांचे वारसदार असलेले प्रकाश आंबेडकर आणि कार्य करणारे अजितदादा ही जोडी महाराष्ट्रात पुढे आली तर यापेक्षा गोड क्षण आमच्यासाठी नसेल. आंबेडकरी चळवळ जर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आली तर महाराष्ट्राची दिशा आणि राजकारण फार वेगळे असेल. जर अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी खांद्याला खांदा लावून एकत्र लढले तर मग महाराष्ट्रात चित्र वेगळे दिसेल असा विश्वास आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला होता.