पुणे,दि.15: कोरोनाची रुग्ण संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरानाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्येत (Corona Cases In Maharashtra) वाढ होत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशातच विविध भागांमध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता दहावी बारावीच्या परीक्षा होणार का? परीक्षा झाल्यास त्या ऑनलाईन होणार की ऑफलाईन असे अनेक प्रश्न आता विद्यार्थ्यांसोबतच पालकांना देखील पडले आहेत.
दहावी बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावी बारावी परीक्षे संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. परीक्षेसंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा या व्हायलाच हव्यात, तसेच त्या ऑनलाईन घेऊन चालणार नाही. त्या ऑफलाईनच व्हायला हव्यात असे माझे मत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी काय निकाल लागला हे सर्वांनीच पाहिले. त्यामुळे गेल्या वर्षीची पुनावृत्ती टाळायची असेल तर परीक्षा या ऑफलाईनच घेतल्या जाव्यात असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांची उत्तर दिली. राज्यात सध्या कोरोना वाढत आहे. नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढू शकतो. राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्य सरकारने जी नियमावली जाहीर केली आहे, त्यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे पवार यांनी म्हटले.