बारामती,दि.4: बारामती व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर स्तुतीसुमने उधळली. आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागा लढवणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. या सगळ्यात बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष आहे.
मी स्वतःच वेगळा विचार करेन…
बारामती येथे बोलताना अजित पवार यांनी इशारा दिला आहे. म्हणाले, ‘बारामती लोकसभा मतदारसंघात माझ्या विचारांचा खासदार झाला तर विकासाची गती आणखी किती तरी पटीने वाढवू. काही लोक तुम्हाला भावनिक बनवतील. खासदारकीला इकडे मत द्या, आमदारकीला अजितला द्या असे म्हणतील. पण मला दोन्ही ठिकाणी तुमची साथ गरजेची आहे. खासदारकीला मला मिठाचा खडा लागला तर आमदारकीला मी स्वतःच वेगळा विचार करेन, कोणाच्या बापाचे ऐकणार नाही.’
“विधानसभेची निवडणूक लोकसभा झाल्यानंतर आहे. लोकसभेला मीच उमेदवार आहे असे समजून तुम्ही मतदान करा अशी विनंती आहे. मी केलेल्या कामाची जर तुम्हाला पावती द्यायची असेल तर तुम्ही मी दिलेल्या उमेदवाराच्या मागे भक्कम उभे रहा. बारामती कशा पद्धतीने विकास कामे झाले आहेत हे तुम्हाला माहिती आहे. शेवटी धाडस दाखवल्यानंतरच कामे होत असतात,” असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मी जे काम करतो, तेवढे कोणीच माइचा लाल करु शकत नसल्याचा दावा अजित पवार यांनी केला. कदाचित कोणी डोळ्यात पाणी आणुन रडतील. पण काम करु शकणार नाही. त्यामुळे कामाच्या पाठीशी उभा रहायचे, की बारामतीच्या चाललेल्या विकासाला साथ द्यायची, विकासाला खिळ घालायची, याचा निकाल बारामतीकरांनो तुम्हाला घ्यायचा आहे, असे परखड आवाहन अजित पवार यांनी केले.
“लोकसभेला विधानसभेला दोन डगरीवर चालणार नाही. लोकसभेला पण माझ्या उमेदवाराला मत द्या आणि विधानसभेला पण मला मते द्या. हा विकासाचा रथ आणखी जोमाने पुढे जाईल. 22 जानेवारीचा रामलल्लांचा सोहळा संपूर्ण जगाने पाहिला व देशभर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातील इतरही देवस्थानला चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. आज बारामतीतील विकास कामे का होतात तर ते मी सत्येत आहे म्हणून होत आहेत. तसेच लोकसभेलाही आपल्या विचाराचा बारामतीचा उमेदवार दिला तरच विकास होईल.” असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी देशात वेगवेगळे राष्ट्रीय महामार्ग, वंदेमातरम, फ्लाय ओव्हर, विमानतळ अशा खुप काही गोष्टी उभा केल्या. शेतकऱ्यांसह विविध घटकातील नागरीकांना अनेक योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात दिल्याचे पवार यांनी नमुद केले.