पुणे,दि.2: भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचं भूमीपूजन प्रसंगी केलेल्या भाषणात अजित पवारांनी चुकीचे वक्तव्य केले होते. वळू-तुळापूर येथील कार्क्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी त्यांचं भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचं वळू-तुळापूर येथे भूमीपूजन झालं. यावेळी अजित पवार यांनी भाषण करताना संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना नंतर माफी मागावी लागली.
काय म्हणाले अजित पवार?
भाषण करताना अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रमाला आल्याबद्दल धन्यवाद मानले. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक तयार करत असताना कुणाच्या काही सूचना आणि कल्पना असतील त्यांनी वेळीच ते लक्षात आणून द्यावे असे आवाहन अजित पवारांनी केले. tv9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
“मी कंत्राटदाराला सांगतो की, दर्जेदार काम झालं पाहिजे की आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. महाराज आपल्या स्वत:च्या आयुष्यात एक सुद्धा निवडणूक हारले नाही, अशाप्रकारचा इतिहास आहे. त्यांचं स्मारक आज वळू आणि तुळापूरला होतंय. त्याचं खूप समाधान मला आणि जनतेला आहे”, असं अजित पवार म्हणाले.
पवार यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करेक्शन सांगितलं. यावेळी एक जण अजित पवार यांच्याजवळ आलं. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या कानात करेक्शन सांगितलं. “सॉरी ते मी राजकारणामुळे निवडणूक म्हटलं. ते लढाई हारले नाहीत. चुकून शब्द गेला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. संभाजी महाराज यांच्या नावाला साजेसं असं स्मारक उभं करताना राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. लोकसभेच्या निवडणुकी आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकींशिवाय काय कळत नाही. पण आमच्यामध्ये एक निष्णांत देवेंद्र फडणवीस आहेत. असं काही झालं की लगेच तिथल्या तिथे लक्षात आणून देतात. धन्यवाद देवेंद्रजी. असंच नेहमी नेहमी अशा गोष्टी लक्षात आणून द्या.” असे म्हणत अजित पवारांनी माफी मागितली.