मुंबई,दि.११: हैदराबादहून थायलंडच्या दिशेने निघालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात बुधवारी मृत्यूचा थरार अनुभवायला मिळाला. फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना विमानाचे समोरील चाक निखळून त्याचे तुकडे-तुकडे झाले. या भीषण तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे ‘हार्ड लँडिंग’ झाले आणि प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, वैमानिकाने दाखवलेल्या कमालीच्या प्रसंगावधानामुळे विमानातील १३३ प्रवासी आणि ७ क्रू मेंबर्स सुरक्षित बचावले असून एक मोठा अनर्थ टळला आहे.
नेमकं काय घडलं?
एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान (IX938) बुधवारी सकाळी हैदराबादवरून थायलंडसाठी रवाना झाले होते. नियोजित वेळेनुसार हे विमान ११:४० वाजता उतरणार होते, परंतु ते ११:२४ वाजता धावपट्टीला स्पर्श करत असतानाच एक भीषण अपघात घडला. विमानाचे पुढचे चाक अचानक निखळले आणि विमानाने जोरात धावपट्टीवर आदळून ‘हार्ड लँडिंग’ केले. चाक तुटल्याने विमान अनियंत्रित होण्याची भीती होती, पण वैमानिकाने विमानावर ताबा मिळवत ते सुरक्षितपणे थांबवले.
विमानतळावर धावपळ, धावपट्टीचे नुकसान:
या घटनेनंतर फुकेत विमानतळावर एकच खळबळ उडाली. विमानाचे चाक निखळल्याने धावपट्टीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी, सुरक्षेच्या कारणास्तव ही धावपट्टी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली. अडकलेले विमान बाजूला करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.
चौकशीचे आदेश:
विमानात दोन चिमुकल्यांसह एकूण १३३ प्रवासी होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांच्या देखभालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, तज्ज्ञांचे एक पथक चौकशीसाठी फुकेतकडे रवाना झाले आहे.
सध्या हे विमान तांत्रिक तपासणीसाठी फुकेत विमानतळावरच असून, प्रवासी सुखरूप असल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.








