छत्रपती संभाजीनगर,दि.२४: भाजपा विरोधी पक्षांच्या बैठकीवर AIMIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपा सरकारविरोधात बिहारची राजधानी पाटणा येथे १५ विरोधी पक्षांची शुक्रवारी ( २३ जून) महाबैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रफुल पटेल उपस्थित होते. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही या बैठकीला उपस्थित होते.
त्यांच्याबरोबर खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरेही त्या बैठकीला गेले होते. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि विविध पक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. परंतु एआयएमआयएम पक्षाला या बैठकीचं निमंत्रण दिलं नव्हतं.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजाविरोधात विरोधकांची एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच त्यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं. नितीश कुमार यांनी देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना या बैठकीचं निमंत्रण दिलं होतं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना निमंत्रण देण्यासाठी नितीश कुमार हे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह मुंबईत येऊन गेले होते. तसेच ते इतर राज्यांमध्येही गेले होते. परंतु कुमार यांनी एआयएमआयएम पार्टीचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना निमंत्रण दिलं नव्हतं. त्यामुळे या बैठकीवर एमआयएम पार्टीने नाराजी व्यक्त केली आहे.
खासदार इम्तियाज जलील म्हणाले…
एमआयएआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले, तुम्हाला जर या देशात भारतीय जनता पार्टीला हरवायचं असेल तर आम्हाला असं वाटतं की, ते ध्येय तुम्ही आमच्याशिवाय साध्य करू शकत नाही. काल पाटण्यात जे पक्ष उपस्थित होते, जे लोक तिथे जमले होते, त्यांच्यापेक्षा कडवा विरोध भाजपाला आम्ही करत आहोत. त्यांना हरवणं ही आमचीही इच्छा आहे. परंतु तुम्ही एमआयएमसारख्या पक्षाला सोडून एक युती करताय. भाजपाला हरवणं हे तुमचं लक्ष्य आहे. तर तुम्ही ते लक्ष्य आमच्याशिवाय साध्य करू शकत नाही.
भाजपाबरोबरच्या लढाईत तुम्ही आमच्याकडे का दुर्लक्ष करताय? भारतातला लोकांचा एक मोठा गट एमआयएम पार्टीला मानणारा आहे. मोठ्या संख्येने लोक बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांना मानतो. ओवैसींना मानणारे लोक अनेक राज्यांमध्ये आहेत. परंतु तुम्ही ओवैसींकडे दुर्लक्ष करून तुमचं ध्येय कमकुवत करत आहात. तुम्ही तुमच्या युतीत आम्हालाही बोलवा, आम्हीही त्यात सहभागी होऊ.