सोलापूर,दि.18: काँग्रेसचा आणखी एक मोठा नेता भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसची अडचण कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेदरम्यान आता पंजाबमधून मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील आनंदपूर साहिब येथील काँग्रेसचे खासदार मनीष तिवारीही (Manish Tewari) भाजपच्या संपर्कात असून ते पक्षात प्रवेश करू शकतात. यावेळी मनीष तिवारी आनंदपूर साहिबऐवजी भाजपच्या निवडणूक चिन्हावर लुधियाना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित असल्याचे बोलले जात आहे.
लुधियाना जागेवर पक्षाकडे सक्षम उमेदवार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. मनीष तिवारी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चादरम्यान संभ्रम निर्माण झाला आहे. मनीष तिवारी हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चादरम्यान त्यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘मनीष तिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा निराधार आहे. ते त्यांच्या मतदारसंघात असून तेथील विकासकामांवर देखरेख करत आहेत. काल रात्रीच त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम केला होता.’
कोण आहेत मनीष तिवारी? | Manish Tewari
मनीष तिवारी हे फक्त खासदार नाहीत तर वकील देखील आहेत. 17 व्या लोकसभेत ते पंजाबमधील आनंदपूर साहिब येथून काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले. यूपीए सरकारच्या काळात ते 2012 ते 2014 पर्यंत माहिती आणि प्रसारण मंत्री आणि 2009 ते 2014 पर्यंत लुधियानाचे खासदार होते. यूपीए सरकारच्या काळात ते काँग्रेसचे प्रवक्तेही होते.
तिवारी हे 1988 ते 1993 पर्यंत भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघाचे अध्यक्ष होते. आणि 1998 ते 2000 पर्यंत भारतीय युवक काँग्रेस (I) चे अध्यक्ष होते. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत ते हरले पण 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाच्या उमेदवाराचा पराभव करून विजयी झाले. मार्च 2014 मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती.