सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. सुरेश गायकवाड

सोलापूर बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी ॲड. बांगी तर ॲड. भोसले सचिव

0

सोलापूर,दि.१२: सोलापूर येथील बार असोसिएशनच्या शुक्रवारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी विधी सेवा पॅनलचे ॲड. सुरेश गायकवाड हे विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. राजेंद्र फताटे यांचा २१० मतांनी पराभव केला.

जिल्हा व सत्र न्यायालयातील सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये शुक्रवारी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी पाचपर्यंत मतदान होऊन लगेचच मतमोजणी झाली. या निवडणुकीसाठी एकूण १४६९ पात्र मतदार होते. त्यापैकी १२१२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सुमारे ८२ टक्के मतदान झाले. दोन पॅनल व चार स्वतंत्र उमेदवार अशा एकूण १४ उमेदवारांनी आपले नशीब अजमावले. विधी विकास व विधी सेवा या दोन पॅनलमध्येच खरी लढत झाली.

उमेदवार व कंसात मिळालेली मते अध्यक्ष ॲड. सुरेश गायकवाड विजयी (७००), ॲड. राजेंद्र फताटे (४९०), उपाध्यक्ष ॲड. आसिम बांगी विजयी (६८६), ॲड. सिद्धाराम म्हेत्रे (५०८). सचिव ॲड. करण भोसले विजयी (५९१), ॲड. अभिजित देशमुख (३३४), ॲड. लक्ष्मण पाटील (२६७). सहसचिव ॲड. अनिता रणशृंगारे विजयी (५४७), ॲड. शाहिन शेख (५१०), ॲड. सुवर्णा शिंदे (१५८). खजिनदार ॲड. अविनाश काळे विजयी (३६८), ॲड. विनयकुमार कटारे (३५६), ॲड. अब्दुल हनिफ शेख (३०२), ॲड. एच. जे. अगनूर (१३७).

मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळे प्रत्येक वकिलाचे फेरीनिहाय निकालाकडे लक्ष लागले होते. विधी सेवाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. गायकवाड, सहसचिवपदाच्या उमेदवार ॲड. रणश्रृंगारे तर विधी विकासचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. वांगी व सचिवपदाचे उमदेवार करण भोसले हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. खजिनदारपदासाठी अँड. काळे व ॲड. कटारे यांच्यात रस्सीखेच सुरू होती.

सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार केला होता. परंतु मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केले. येत्या १४ नोव्हेंबर रोजी नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अध्यक्ष ॲड. नीलेश ठोकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here