ॲड. राजेश कांबळे खून प्रकरण; सुनावणीस सुरूवात

0

सोलापूर,दि.3: ॲडवोकेट राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार 43, ब्रह्मचैतन्य नगर, नवीन आर टी ओ सोलापूर यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, अॅड. सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणीस सुरूवात झाली आहे.

        

यात हकीकत अशी की, दिनांक 8-6-2019 रोजी यातील मयत अॅड. राजेश कांबळे हे सकाळी अकरा वाजेचे सुमारास पक्षकारांना भेटून एका तासाने परत येतो असे त्यांच्या पत्नीस सांगून त्यांच्या घरातून मोटरसायकलवर निघून गेले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नीने दुपारी बाराच्या सुमारास फोन लावला असता मयत राजेश यांनी मी बंटीच्या घरी आहे केस संदर्भात चर्चा चालू आहे असे सांगितले. 

त्यानंतर त्यांची पत्नी त्यांचा भाऊ यांनी फोन लावला असता मयत राजेश याचा फोन बंद लागत होता. रात्री शोधा शोध केली तरी मयत राजेश कांबळे हे मिळून आले नाहीत. त्यावर  पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. तपासादरम्यान यातील आरोपी बंटी खरटमल याच्यावर संशय बळावला तसेच पोलिसांना बंटी खरटमल याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. 

त्यावेळी पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत पाहिले असता मयत राजेश कांबळे याचे हात, पाय,धड व मुंडके हे तोडून दोन प्लास्टिक बॅगेत भरलेले दिसून आले. त्यावर पोलिसांनी खुनात सहभाग असलेले वरील तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते.

खटल्याच्या सुनावणीच्या वेळी तीन साक्षीदारांनी साक्षी नोंदविल्या. त्यात पंच साक्षीदार अमित प्रदेश गाडे यांनी आरोपी बंटी खरटमल याची अंगझडती व कपडे जप्ती पंचनामा केला त्यावेळी त्याच्याकडून रोख रक्कम तसेच मयताची चांदीची अंगठी, रक्त असलेले कपडे व त्याची कागदपत्रे मिळून आले अशी महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविली.

त्यानंतर दुसरा पंच साक्षीदार शकील इसाक कोरबू यांनी आरोपी बंटी खरटमल याच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले व ते कुलूप जप्त केले बाबतची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविली.

त्यानंतर तिसरा पंच साक्षीदार गुरण्णा सिद्राम म्हेत्रे यांनी आपली साक्ष नोंदविताना आरोपी बंटी खरटमल याने स्वतःहून पंचा समक्ष निवेदन दिले की मयताची गाडी व चावी हे ज्या ठिकाणी ठेवले आहे ते काढून देतो त्याप्रमाणे त्याने अक्कलकोट रेल्वे स्टेशन जवळून गाडी व गाडीची चावी काढून दिली, अशी महत्वपूर्ण साक्ष नोंदविली.

आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासात साक्षीदारांनी नकारात्मक उत्तरे दिली.  या खटल्याची पुढील सुनावणीस 4/10/2024 ही तारीख नेमण्यात आली.

या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे अॅड. विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर 1 तर्फे अॅड. राजेंद्र फताटे आरोपी नंबर 2 तर्फे अॅड. नागराज शिंदे आरोपी नंबर ३ तर्फे अॅड. जयदीप माने हे काम पाहत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here