स्व:तासाठी खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके: आदित्य ठाकरे

0

मुंबई,दि.13: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार असताना राज्यात एक मोठी कंपनी गुंतवणूक करणार होती. ‘वेदांता-फॉक्सकॉन’ ही कंपनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणार होती. पण राज्यात दोन महिन्यांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर अचानक ही कंपनी महाराष्ट्राबाहेर गेली. विशेषत: वेदांतासारखी कंपनी महाराष्ट्रात तब्बल 1 लाख तरुणांना रोजगार देणार होती. पण ही कंपनी अचानक गुजरात गेली, असा दावा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे यांनी आज माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सध्याच्या भाजप-शिंदे गटाच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर सडकून टीका केली. “राज्यातलं सरकार हे खोके सरकार आहे. जीत के हारने वालो को खोके सरकार कहते है”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

“वेदांता प्रकल्प राज्यात येणार होता. पण तो प्रकल्प गुजरातला गेला. या प्रकल्पामुळे राज्यातील 1 लाख तरुणांना रोजगार मिळू शकला असता. राज्यातील ही गुंतवणूक नेमकी का निघून गेली ते स्पष्ट करा. वेदांता कंपनीच्या अनिल अग्रवालांशी चर्चा केली होती. फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्राबाहेर गेली. महाराष्ट्रात येणारी कंपनी शेवटच्या मिनिटाला गुजरातला निघून गेली. ती का निघून गेली?”, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

“तळेगाव या ठिकाणी इंडस्ट्री येणार होती. 1.75 लाख कोटींची गुंतवणूक होती. ही कंपनी 75 हजार रोजगार निर्माण करणारी होती. पण कंपनी महाराष्ट्राबाहेर गेली तेव्हा खोके सरकार काय करत होते? एका महिन्यात असं काय घडलं की ही गुंतवणूक राज्याबाहेर कशी काय गेली? या राज्यात आम्ही साडेसहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणत होतो. दावोसमध्ये आम्ही या संदर्भात अनेक बैठका घेतल्या होत्या. महाराष्ट्रात ही कंपनी येणार होती तर मग दुसऱ्या राज्यात का आणि कशी गेली? राज्यातील खरे मुख्यमंत्री कोण असतील त्यांनी खुलासा करावा”, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

“मंत्रालयात बसून कामं करणे गरजेचं आहे. स्व:तासाठी खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके. राज्य सरकारचा कुठेच अंकुश दिसत नाही. 1 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार होते”, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here