Jaya Prada: अभिनेत्री जया प्रदा यांना सहा महिन्यांची शिक्षा, पाच हजारांचा दंड

0

चेन्नई,दि.११: अभिनेत्री जया प्रदा (Jaya Prada) यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. चेन्नईमधील रायपेटा येथील जया प्रदा यांच्या मालकीच्या चित्रपटगृहातील कर्मचार्‍यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात त्यांना पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चित्रपटगृह चेन्नईचे राम कुमार आणि राजा बाबू चालवतात. 

अभिनेत्री जया प्रदा यांना सहा महिन्यांची शिक्षा | Jaya Prada

दरम्यान, चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांना ईएसआयचे पैसे देण्यास चित्रपटगृहाचे व्यवस्थापन अपयशी ठरले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. यानंतर जया प्रदा यांनी कर्मचार्‍यांना पूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन दिले आणि खटला रद्द करण्यासाठी न्यायालयात दाद मागितली. मात्र, कामगार सरकारी विमा महामंडळाच्या वकिलांनी जया प्रदा यांच्या अपीलवर आक्षेप घेतला. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित जया प्रदा आणि इतर तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच प्रत्येकाला पाच हजार रुपये दंड भरण्यास सांगितले होते.

जया प्रदा यांनी समाजवादी पक्षाकडून लोकसभेत दोनदा रामपूरचे प्रतिनिधित्व केले आहे. २००४ आणि २००९ मध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून रामपूरची जागा जिंकली होती. यानंतर समाजवादी पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी बिजनौरमधून आरएलडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. २०१९ मध्ये पुन्हा जयाप्रदा यांना रामपूरच्या जागेवर भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र, तेव्हा सुद्धा जया प्रदा यांना पराभवाचा सामना करावा लागला.

रामपूरमधून खासदार राहिलेल्या जयाप्रदा यांची राजकीय कारकीर्द १९९४ मध्ये तेलुगू देसम पक्षातून सुरू झाली. जयाप्रदा १९९६ मध्ये आंध्र प्रदेशमधून पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. यानंतर २००४ मध्ये त्या समाजवादी पक्षात सामील झाल्या आणि दोनदा लोकसभेच्या खासदार झाल्या. त्यांनी राष्ट्रीय लोकदलाकडून लोकसभा निवडणूकही लढवली होती. नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here