सोलापूर,दि.११: सोलापूर शहर व परिसरात मोटारसायकलवरून विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या नागरिकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येत असून बुधवारी ५२२ जणांवर विनाहेल्मेट व वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल कारवाई करत एकूण २ लाख ८२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
रस्ते अपघात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन समितीने वाहतूक नियमांचे पालन करण्यासंबंधी अहवाल सादर केला आहे. मोटारसायकल चालवित असताना हेल्मेटचा वापर न केल्यामुळे होणाऱ्या अपघातामध्ये जीवितहानी होत असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे.
त्यामुळे शहर वाहतूक शाखेकडून व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. बुधवारी १३५३ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये ५२२ जणांचा समावेश आहे. नागरिकांनी मोटारसायलवरून प्रवास करताना हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन शहर उत्तर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आर. ए. माने यांनी केले आहे.