सोलापूर,दि.१२: सोलापूर शहर व परिसरात गुरुवारी नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई करण्यात आली. १३४९ केसेस दाखल करून त्यातून पाच लाख सहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्या ५५३ जणांना दंड ठोठावण्यात आला आहे.
शहर व परिसरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. यामध्ये वाहनचालकांची कागदपत्रे तपासण्यात आली. तसेच दुचाकी चालविताना दुचाकीस्वाराच्या डोक्यावर हेल्मेट नसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहर वाहतूक शाखेच्या उत्तर व दक्षिण विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत नियम मोडणाऱ्या १३४९ जणांना दंड ठोठावण्यात आला.
यामध्ये हेल्मेट नसणाऱ्या ५५३ जणांचा समावेश आहे. त्यामध्ये पोलीस विभाग १५ इतर सरकारी विभागातील एक व इतर ७८८ केसेसना समावेश आहे. पोलिसांनी पाच लाख सहा हजारांचा दंड ठोठावला आहे.
वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होत आहेत. मोटारसायकल चालवताना हेल्मेटचा वापर न केल्यामुळे होणाऱ्या अपघातामध्ये जीवितहानी होत असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे.
ही हानी टाळण्याकरिता वाहनचालकांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे मोटारसायकलवरून प्रवास करीत असताना हेल्मेटचा वापर करून आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन सुरक्षित करा. त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांचे पालन करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेने केले आहे.