सोलापूर,दि.१०: पोलीसांवर हल्ला केल्याप्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता केली आहे. यात हकिकत अशी की, दि. १४/०५/२०२२ रोजी मोहोळ पोलीस स्टेशन मधील आष्टी गावाचे पोलीस बीट अंमलदार संतोष चव्हाण हे पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी कळाली की, आष्टी गावामध्ये जुगाराचा मोठा अड्डा सुरु असून अनेक लोक बेकायदेशीररित्या जुगार खेळत आहेत. त्याप्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण व इतर पोलीस अधिका-यांनी सदर आष्टी गावामध्ये धाड टाकली असता त्यांना तेथे अनेक लोक बेकायदेशीररित्या जुगार खेळत असल्याचे आढळून आले.
त्यामुळे सदर पोलीसांनी लागलीच त्यातील काही लोकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्या लोकांपैकी आरोपी सतीश श्रीमंत गुंड, रा. आष्टी ता. मोहोळ याने सदर पोलीसांना धमकी दिली कि, मी असे अनेक पोलीस बघितले असून तुम्हाला मी घरी पाठवेन तसेच सदर फिर्यादी पो. कॉ. संतोष चव्हाण यांच्यावर हल्ला चढविला.
अशा प्रकारे सरकारी कामात हल्ला करुन अडथळा निर्माण केला. त्यामुळे सदर फिर्यादीने मोहोळ पोलीस स्टेशन येथे सदर आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन सदर आरोपीस अटक करण्यात आली. त्यानंतर सदर गुन्हयाचा तपास करुन पोलीसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदरचा खटला प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर सलमान आझमी यांच्याकडे चालला. सदर खटल्यादरम्यान सरकार पक्षाने एकूण ५ साक्षीदार तपासले. सदर साक्षीदारांपैकी फिर्यादी व घटनास्थळी उपस्थित असलेला एक साक्षीदार यांची उलटतपासणी सदर खटल्यास कलाटणी देणारी ठरली. यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर यांनी उलटतपास घेतेवेळी अनेक महत्वाच्या बाबी न्यायालयासमोर आणल्या.
त्यातल्या काही बाबी म्हणजे, सदर फिर्यादीने सदर गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहितीची नोंद पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित असलेल्या ठाणे अंमलदाराला कळवून स्टेशन डायरीमध्ये करणे गरजेचे असताना अशी कोणतीच महत्वाची नोंद स्टेशन डायरीमध्ये दिसून येत नाही. तसेच सदर आरोपीचा तथाकथित घटनेनंतर तात्काळ अटक पंचनामा करणे गरजेचे असताना देखील तसा कुठलाच पंचनामा केलेला दिसून येत नाही. तसेच सदर तथाकथित घटनेबद्दल साक्षीदारांच्या कथनामध्ये तफावत दिसून येत आहे. सदरचा आरोपीतर्फे केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी सतीश श्रीमंत गुंड याची प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी यांनी निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. राम शिंदे, अॅड. फैयाज शेख, अॅड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.