सोलापूर,दि.२६: दोघांच्या मृत्युप्रकरणी न्यायालयाने माजी सैनिकासह दोघांना दोषमुक्त केले आहे. यातील संशयित नारायण महादेव पांढरे व अर्जुन यशवंत पांढरे रा. होनमुर्गी, ता. दक्षिण सोलापूर, सोलापूर यांची दोघांच्या मृत्युप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश खुणे यांनी दोष मुक्त केले.
यात हकीकत अशी की, दिनाक ०४/१२/२०१९ रोजी पो. कॉ. विश्वनाथ पवार यांनी मंद्रूप पोलीस स्टेशन येथे अशी फिर्याद दिली की रवी अण्णाप्पा पांढरे व इरेश रामचंद्र पांढरे दोघे रा. होनमुर्गी हे ०४/१२/२०१९ रोजी पहाटे २.०० वाजता पाईप लाईनचे लिकेज काढण्याकरिता खड्डा खोदून त्यात उतरून काम करीत असताना अंगावर मातीचा ढिगारा पडून जखमी झाल्याने त्यांना यशोधरा हॉस्पिटल, सोलापूर येथे आणले व उपचार चालू असताना पहाटे ३.२० वाजता मयत झाले आहे.
अशा रीतीने पाईप लाईन गळतीचे दुरुस्तीचे काम करताना हेल्मेट व अधिक रुंदीचा खोदकाम व इतर सुरक्षितता घेणे जरुरीचे होते तसे न करता त्यांनी हयगयी व निष्काळजीपणा करून टॅार्चच्या उजेडात खोल खड्डा खादून पाईप लाईनचे गळती काढत असताना अंगावर डांबरी रोडचे खडी, मातीचे ढिगारा पडून रवी अण्णाप्पा पांढरे व इरेश रामचंद्र पांढरे दोघे रा. होनमुर्गी हे गंभीर जखमी होऊन उपचार दरम्यान मयत झाले आहे.
परंतु यातील मयताची पत्नी यांच्या जबाबात घटना स्थळी नारायण महादेव पांढरे व अर्जुन यशवंत पांढरे रा. होनमुर्गी, ता. दक्षिण सोलापूर, सोलापूर हे दोघेही हजर होते असे सांगितल्यामुळे सदर दोघांना आरोपी करण्यात आले होते.
यातील संशयित नारायण महादेव पांढरे व अर्जुन यशवंत पांढरे यांनी सदर प्रकरणात दोषमुक्ती साठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात अर्ज दाखल केलेला होता व तो अर्ज नामंजूर झालेला होता.
त्या आदेशाविरुद्ध आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला व त्या अर्जाच्या युक्तीवादावेळी संशयित आरोपींचे वकील ॲड. अभिजित इटकर यांनी काही महत्वाच्या बाबी उघडकीस आणल्या त्या म्हणजे गुन्हा नोंद होतेवेळी या अर्जदारांची नावे घेण्यात आलेली नव्हती. तपासणी दरम्यान एक साक्षीदार वगळता इतर साक्षीदारांच्या जबाबात कुठेही या अर्जदारांची नावे आढळून येत नाहीत. दबावतंत्र म्हणून सदरची खोटी फिर्याद दाखल केल्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर बाबींचा विचार करून यातील संशयित आरोपी नारायण महादेव पांढरे व अर्जुन यशवंत पांढरे रा. होनमुर्गी, ता. दक्षिण सोलापूर, सोलापूर यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश खुणे यांनी दोष मुक्त केले. यात आरोपींतर्फे ॲड. अभिजित इटकर, ॲड. नागेश मेंडगुदले, ॲड. राम शिंदे, ॲड. संतोष आवळे, ॲड. फैयाज शेख, ॲड. सुमित लवटे, ॲड. शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.