सोलापूर,दि.१३: अल्पवयीन मुलीस पळवून नेवून बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. यात हकिकत अशी की, दि. २७ /०२ /२०१६ रोजी पिडितेची परीक्षा असल्यामुळे सदर पिडीता परीक्षा देण्यासाठी मंद्रुपमध्ये आली होती.
पीडिता मंद्रूपला आली असता सकाळी १०.०० च्या सुमारास गावातील शास्त्री हॉस्पीटल समोरुन आरोपी महेश वसंत चव्हाण, रा. औराद, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर व त्याचे इतर दोन साथीदारांनी सदर पिडीतेस बळजबरीने कार मध्ये बसविले व धमकी दिली की, आरडा – ओरडा केला तर ॲसिड टाकण्यात येईल.
तद्नंतर मुख्य आरोपी महेश चव्हाण हा पिडितेला घेऊन नांदणी मार्गे विजापूर तेथून बागलकोट, बागलकोट ते बेंगलोर व बेंगलोर वरुन कोची ( केरळ ) येथे गेला. कोची येथे एक अज्ञात ठिकाणी नेवून आरोपी याने पिडितेच्या इच्छेविरुध्द अनेक वेळा बलात्कार केला. अश्या आशयाची फिर्याद मंद्रुप पोलीस स्टेशन येथे पिडितेच्या आईने दिली.
या प्रकरणी पोलीसांनी तपास करुन न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले. सदरच्या खटल्याच्या वेळेस सरकार पक्षातर्फे एकुण ८ साक्षीदार तपासण्यात आले. सदर खटल्यामध्ये पिडितेची व पिडीतेस तपासणाऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्यांची उलट तपासणी सदर खटल्यास कलाटणी देणारी ठरली.
सदर आरोपी तर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सदर पिडीता व मुख्य आरोपी महेश चव्हाण हे एकमेकांवर प्रेम करत होते व दोघांच्या प्रेमप्रकरणामुळे सदर पिडीता ही मुख्य आरोपी महेश चव्हाण याच्या सोबत लग्न करण्याच्या उद्देशाने पळून गेली. तसेच सदर पिडितेने मंद्रुप येथे आल्यानंतर आई – वडिलांच्या दबावा पोटी सदरची फिर्याद दाखल केली आहे. तसेच इतर आरोपींनी कुठलाही गुन्हा केलेला नाही. सदर युक्तीवाद ग्राहय धरुन सत्र न्यायाधिश शिरभाते यांनी सदर आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात मुख्य आरोपी महेश चव्हाण याच्या तर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. युवराज आवताडे, ॲड. फैयाज शेख यांनी तर आरोपी नं. २ गुरुनाथ परशुराम कोळी याच्या तर्फे ॲड. ही. डी. फताटे तर आरोपी नं. ३ गणेश अमृत जाधव याच्या तर्फे ॲड. रेवा टिकोळे यांनी काम पाहिले.