मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

0

सोलापूर,दि.२१: वायरमन यास मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यात हकिकत अशी की, दिनांक १६/०८/२०१६ रोजी फिर्यादी प्रविण औदुंबर टोणपे हे कुरुल ता. मोहोळ येथील वायरमन म्हणून कार्यरत असताना औंढी, ता. मोहोळ येथे वीज तोडणीसाठी सहकर्मचाऱ्याच्या सोबत गेले असता, त्यांना विनायक मसू सोनवणे रा. औंढी, ता. मोहोळ, जि. सोलापूर यांनी मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मोहोळ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल होती.

सदरकामी मोहोळ पोलीसांनी तपास करुन आरोपी विरुध्द दोषारोपत्र दाखल केले. सदरचा खटला सत्र न्यायाधिश आर. डी. खेडेकर यांचे कोर्टात चालला. सदरचा खटल्यामध्ये सरकार पक्षाकडून साक्षीदार तपासण्यात आलेल्या साक्षीदारांपैकी फिर्यादीची उलट तपासणी सदर खटल्यास कलाटणी देणारी ठरली.

सदर फिर्यादीच्या उलट तपासामध्ये आरोपी तर्फे ॲड. अभिजीत इटकर यांनी अनेक महत्वाचे मुद्दे उजेडात आणले. तसेच सदर खटल्यातील तपास अधिकाऱ्याची ही उलट तपासणी अत्यंत महत्वाची ठरली . आरोपींचे वकिल ॲड. अभिजीत इटकर यांनी असा युक्तीवाद केला की, घटने दिवशी वीज बिल थकित असल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा कोर्टासमोर आणलेला नाही.

तसेच सदर फिर्यादीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची हालचाल पुस्तिका ( मुव्हमेंट रजिस्टर ) जप्त केलेले नाही. जेणेकरुन त्या पुस्तिकेवरुन सदर फिर्यादी हा घटनेदिवशी घटनास्थळी गेला होता का नाही ही बाब स्पष्ट झाली असती.

तसेच सदर आरोपीचे घटनेचे दिवशीचे मोबाईल लोकेशन सुध्दा कोर्टासमोर आणले गेलेले नाही. सदर बाबींचा विचार करुन सत्र न्यायाधिश आर. डी. खेडेकर यांनी आरोपीची सदर खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे ॲड. अभिजित इटकर, ॲड. राम शिंदे, ॲड. संतोष आवळे तर सरकार पक्षातर्फे ॲड. जन्नु यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here