बार्शी,दि.३०: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास व १० हजार दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा स्तर न्यायालयाचे न्यायाधीश एस.डी अग्रवाल यांनी हा निकाल दिला.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आरोपी सागर दिपक जगताप ( वय २२ ) याने २१ ऑक्टोबर २०१८ रोजी रात्री आठच्या सुमारास अल्पवयीन पिडीता ही खेळत असताना तिचे तोंड दाबून एका घराच्या पाठीमागे जबरदस्तीने दुष्कर्म केले. याबाबत घरी कोणास संगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली. पोलीसांनी पिडीतेचे आईचा जबाब नोंदवून आरोपीविरूध्द टेंभूर्णी पोलीस ठाणेस बाल लैंगिक अत्याचार कायदाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
पोलीसांनी आरोपीस अटक करून आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. सबळ पुरावा गोळा करून सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा सिद्ध करण्यासाठी ९ साक्षीदार तपासण्यात आले व आरोपीच्या वकिलांच्या वतीने बचावासाठी २ साक्षीदार तपासण्यात आले. यातील फिर्यादी व पिडीतीची तसेच फिर्यादीचे साक्षीस अनुसरुन वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष तसेच तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे व पिडीते बरोबर झालेल्या अत्याचाराच्या अनुषंगाने आलेला पुरावा या सर्व बाबी सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर मांडल्या.
सरकार पक्षाचे वतीने युक्तीवाद करण्यात आला की, आरोपीने अल्पवयीन मुलीवर अमानुष असे कृत्य केलेले आहे, तसेच फिर्यादी व इतर साक्षीदार यांची आरोपी सोबत कोणत्याही प्रकारे पूर्व वैमनस्य नसल्याने खोटया गुन्हयात आरोपीस गुंतवले नाही. सरकार पक्षाच्या युक्तीवादाला सहायक म्हणुन सर्वोच्च न्यायालय यांचे दाखले देण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तीवाद व आरोपीविरुध्द आलेला पुरावा याचा विचार करता अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस.डी अग्रवाल यांनी आरोपी यास दोषी धरुन १० वर्षे सक्त मजुरी व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षाची सक्त मजूरी अशी शिक्षा ठोठावली.
सरकार पक्षा तर्फे ॲड. प्रदिप बोचरे , तत्कालीन सरकारी वकिल ॲड. दिनेश देशमुख व ॲड. शाम झालटे यांनी काम पाहिले.