व्यापाऱ्याची अडीच कोटीची फसवणूक, आरोपीला अटक

0

अकलूज,दि.१८: गुजरातच्या व्यापाऱ्याला अडीच कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी येथील अंबादास ऊर्फ अण्णा सायबू ओरसे (रा. राऊतनगर) यास अटक केली आहे. फिर्यादी प्रकाशराज शेषमलजी जैन ( वय ६४, रा. अहमदाबाद ) यांना आरोपी अंबादास ओरसे याने सांगितले की, मला तिरुपती बालाजी मंदिराला पूजा साहित्य पुरवण्याचे तीन हजार कोटी रुपयांचे काम मिळाले आहे.

या कामात जर आपण मला मदत केली तर तुम्हाला व्यवसायासाठी १३० कोटी रुपये देईन. २९ जून २०१९ पासून यासाठी आरोपीने प्रकाशराज यांच्याकडून रोख आरटीजीएसच्या माध्यमाने सुमारे २ कोटी ५८ लाख रुपये घेतले. त्याचबरोबर फिर्यादीचे मित्र मदन मिरजकर यांच्याकडूनही १५ लाख रुपये उकळले. या दोनजणांकडून त्याने एकूण २ कोटी ७८ लाख रुपये जमविले.

काही दिवसांनंतर प्रकाशराज हे अंबादासला दिलेली रक्कम परत मागू लागताच आरोपीने त्यांना दमदाटी केली. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्ष येताच प्रकाशराज यांनी अकलूज पोलिसांत धाव घेतली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर हे करीत आहेत. मोठ्या रकमेच्या फसवणुकीच्या घटनेमुळे परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here