मुंबई,दि.16: मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यातील सरकारी महाविद्यालयामध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. वार्षिक स्नेहसंमेलनावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करणाऱ्या मुलींचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ आणि फोटो काढणारे विद्यार्थी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. सीसीटीव्ही समोर येताच पोलिसांनी धडक कारवाई करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. हे सर्व विद्यार्थी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. दैनिक सामनाने टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
मंदसौर जिल्ह्यातील भानपुरा येथील सरकारी महाविद्यालयामध्ये मंगळवारी वार्षिक युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी काही मुली कपडे बदलण्यासाठी क्लास रुममध्ये गेल्या होत्या. त्यांच्या पाठोपाठ आरोपीही तिथे पोहोचले आणि दारावर चढून खिडकीतून त्यांनी मुलींचे कपडे बदलतानाचे फोटो आणि व्हिडीओ काढले. या प्रकरणी पीडित मुलींना महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे तक्रार केली.
कॉलेज प्रशासनाने याची गंभीर दखल घेत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी कॉलेज आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हींची पडताळणी केली. यात सदर विद्यार्थी दोषी आढळताच त्यांना अटक करण्यात आली, तर एक जण अद्याप फरार आहे. अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे वय 20 ते 22 असल्याची माहिती एसपी विनोद मिना यांनी दिली.








