सोलापूर,दि.22: जिल्ह्यातील महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात असून ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करायचे आहे, तक्रार निवारणासाठी 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिली.
जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेंतर्गत 72 हजार 877 शेतकऱ्यांना 648.98 कोटी रूपयांचा लाभ मिळाला आहे. आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक शाखेशी संपर्क साधून मोहिमेत प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. तालुकास्तरीय समितीकडे तक्रार दाखल केली आहे, अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा. आधार प्रमाणीकरण ही अंतिम संधी असून प्रमाणीकरण न झाल्यास त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार नाही, असेही भोळे यांनी सांगितले.
शिल्लक लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून यादीतील शेतकऱ्यांचेही आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घेण्यात येणार आहे, पात्र सभासद शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन भोळे यांनी केले आहे.