सोलापूर,दि.१३: एका तरुणाने लग्न जमत नसल्याने चक्क राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. अलिकडच्या काळात लग्न जुळत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. वाढत्या अपेक्षा, वैचारिक अभाव यामुळे लग्न जमत नाहीत. मुले-मुलांची लग्ने वेळेवर होत नसल्याने वये निघून जात आहेत. ग्रामीण भागातील मुलांची तर लग्ने लवकर जमत नाहीत. असेच एका तरूणाचे लग्न होत नसल्याने तरुण मोठा निर्णय घेतला. स्थानिक पातळीवर ही समस्या सुटण्याची आशा संपल्याने तरुणाने आता थेट देशपातळीवरील नेत्याला साकडे घातले आहे.
अकोल्यातील एका तरुणाने परवा, शनिवारी (८ नोव्हेंबर) चक्क ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनाच विनंती केली की, माझे लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही! या तरुणाचे लग्न होत नसल्यामुळे त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना पत्र लिहून, ‘मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही’, असे साकडे घातले आहे. ‘दैनिक लोकमत’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
अकोल्यात शनिवारी शरद पवार यांनी शेतकरी संवाद कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी उपस्थितांपैकी काही नागरिकांनी त्यांना निवेदनं दिली. त्यामध्ये एकाकीपणा असह्य झालेल्या लग्नाळू तरुणाचे निवेदन होते. यामध्ये त्याने स्वत:चा पत्ता आणि मोबाईल नंबर दिले आहे. हे निवेदन वाचून शरद पवार यांच्यासह व्यासपीठावरील नेतेही अवाक झाले. या तरुणाचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
स्वत:चा पत्ता आणि मोबाइल नंबरसह शरद पवार यांना विनंती करताना हा तरुण म्हणतो, ‘माझे वय वाढतेय, भविष्यात माझे लग्न होणार नाही, मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायलाही तयार आहे. तिथे चांगले काम करीन आणि संसार नीट चालवीन, याची हमी देतो.’ हा तरुण पत्राचा शेवट, मला जीवनदान द्यावे, तुमचे उपकार मी विसरणार नाही, अशा शब्दांत करतो. सामान्य माणूस अजूनही शरद पवारांकडे किती आशेने पाहतो, याचे हे निदर्शक ठरावे. हे पत्र अस्वस्थ करणारे आहे. अपुरे शिक्षण, बेरोजगारी व गरिबीच्या चक्रात पिळून निघणाऱ्या ग्रामीण तरुणांच्या वेदना या पत्राने समोर आणल्या आहेत.








