कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्याने दिली ‘जय श्रीराम’ची घोषणा

0

गाझियाबाद,दि.२१: गाझियाबादमधील एबीईएस इंजिनिअरिंग कॉलेजमधील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. गाझियाबादच्या या व्हिडीओमध्ये कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्याने सादरीकरणापूर्वी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने एका शिक्षिकेनं त्यावर तीव्र आक्षेप घेतल्याचा व्हिडिओही व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया सध्या येत आहेत.

काय घडलं?

हा प्रकार गाझियाबादच्या सुप्रसिद्ध ABSE Engineering College मध्ये घडला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात नेमकं काय घडलं, हे दिसत आहे. कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात एक विद्यार्थी गाणं सादर करण्यासाठी स्टेजवर आल्यानंतर समोर बसलेल्या विद्यार्थ्यांकडून टिप्पणी केली जात होती. त्यातच काही विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यापाठोपाठ स्टेजवरच्या विद्यार्थ्यानंही “जय श्रीराम भाई” म्हणत त्यांना प्रतिसाद दिला.

आत्तापर्यंत समोर खुर्चीवर बसून हा सगळा प्रकार बघणाऱ्या शिक्षिका या विद्यार्थ्याच्या घोषणेनंतर पुन्हा एकदा समोरच्या विद्यार्थ्यांमधून ‘जय श्रीराम’ची घोषणाबाजी झाल्यानंतर चांगल्याच भडकल्या आणि त्यांनी स्टेजवरच्या विद्यार्थ्याला संतप्त शब्दांत सुनावलं. “तुम्ही लोक इथे घोषणाबाजी करण्यासाठी आलेले नाही आहात. हा कॉलेजचा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. तू आता गाणं गाणार नाही”, असं या शिक्षिकेनं विद्यार्थ्याला सुनावलं.

शिक्षिकेचं स्पष्टीकरण!

दरम्यान, याच कार्यक्रमातला आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विद्यार्थ्याला सुनावणाऱ्या शिक्षिकाच स्पष्टीकरण देत असल्याचं सांगितलं जात आहे. “आपण सगळे इथे एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलो आहोत. चांगला वेळ घालवण्यासाठी आपण इथे आलो आहोत. मग इथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा का दिल्या जात आहेत? याला काहीच अर्थ नाहीये. तुम्ही शिस्तीचं पालन करा. हा कार्यक्रम तेव्हाच होईल, जेव्हा तुमच्याकडून शिस्तीचं पालन होईल. नाहीतर आम्ही भविष्यात कोणताही कार्यक्रम करणार नाही. तुम्ही एका चांगल्या कॉलेजमध्ये शिकत आहात. इतक्या चांगल्या पद्धतीने बसले आहात. मग तुमची वागणूकही चांगली असायला हवी. एबीईएसचा विद्यार्थी बसलाय आणि काहीतरी निरर्थक बोलतोय असं व्हायला नको”, असं या शिक्षिका व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एबीईएस कॉलेजच्या बाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित शिक्षिकेला कामावरून बडतर्फ करण्याचीही मागणी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here