शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाची ट्रकला धडक

0

विशाखापट्टणम,दि.22: शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाची ट्रकला धडक होऊन अपघात झाला आहे. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे एक धक्कादायक अपघात घडला आहे. शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या रिक्षा आणि ट्रकच्या अपघातामध्ये 8 चिमुकले जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

कसा झाला अपघात?

समोर आलेल्या माहितीनुसार, शाळकरी मुलांना नेणारी रिक्षा आणि ट्रकचा हा अपघात आज म्हणजेच 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजून 36 मिनिटांनी झाली. हा अपघात विशाखापट्टणममधील एका उड्डाणपुलाखालील चौकात झाला. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या दृष्यांमध्ये ट्रक उड्डाणपुलाखालील रस्त्यावरुन ट्रक येत असतानाच दुसऱ्या बाजूने भरधाव वेगात येणाऱ्या शाळकरी मुलांना घेऊन जात असलेल्या रिक्षाने ट्रकला धडक दिली. रिक्षा इतक्या वेगात होती की ट्रकला धडक दिल्यानंतर रिक्षामधली मुलं रस्त्यावर पडली.

मुलांची शुद्ध हरपली

अपघातानंतर रिक्षामधून बाहेर फेकल्या गेलेल्या काही मुलांची शुद्ध हरपल्याचंही व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येत आहे. अपघातानंतर काही वेळात आजूबाजूच्या लोकांनी रस्त्यावर बेशुद्धावस्तेत पडलेल्या मुलांना उचलून त्यांना मदत केल्याचं दिसत आहे.

रिक्षावाल्याचीच चूक असल्याचा दावा

या व्हिडीओ खालील कमेंट्समध्ये नेमकी चूक कोणाची आहे याबद्दल चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे. एकाने ‘रिक्षाचालकाचा यासाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली पाहिजे,’ असं म्हटलं आहे. रुद्र राजू नावाच्या अन्य एका व्यक्तीने, “बऱ्याच वेळानंतरही या ठिकाणी रुग्णवाहिका आली नव्हती. विशाखापट्टणमसारख्या मोठ्या शहरात अशी परिस्थिती आहे. आंध्र प्रदेशमधील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे,” असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.

अन्य एकाने ट्रक चालक व्यवस्थीत सरळ जात होता. संपूर्ण चूक रिक्षाचालकाची आहे. त्याने वाहतुकीचे नियम पाळले नाहीत असं म्हटलं आहे. अन्य एकाने रिक्षा चालक जसा काही रेसिंगमध्ये वाहन चालवत असल्याप्रमाणे वेगाने जात होता. अशा लोकांचं लायसन्स रद्द केलं पाहिजे, असं म्हटलं आहे. अन्य एकाने या अपघातानंतर एकही कारवाला मदतीसाठी थांबला नाही पण दुचाकीस्वार मदतीला थांबल्याचं म्हटलं आहे. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा नाही का असा प्रश्न एकाने उपस्थित केला आहे. सिग्नल असता तर हा अपघात झालाच नसता असंही त्याने म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here