काँग्रेसच्या आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता

0

पणजी,दि.१०: महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्यानंतर आता गोव्यात राजकीय भूकंप होणार आहे. गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून अकरापैकी दहा आमदार विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याच्या तयारीत आहेत. भाजप श्रेष्ठींकडून या विलिनीकरणाला हिरवा कंदील मिळाला असून आज सायंकाळपर्यंत दहा आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्या सोमवार ११ जुलैपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडून देणाऱ्या हालचाली विरोधी काँग्रेसची आमदारांमध्ये गतिमान झाल्या आहेत. शनिवारी या हालचालींचा सुगावा लागल्यानंतर काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडु राव तातडीने दाखल झाले. त्यांनी आमदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधी पक्ष नेते मायकल लोबो तसेच अन्य नऊ काँग्रेसचे आमदार मिळून एकूण दहा जण काँग्रेस विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याबाबत ठाम असल्याची माहिती मिळते.

भाजपच्या एका स्थानिक वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून विलीनीकरणास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत किंवा जास्तीत जास्त उद्या सकाळपर्यंत हे आमदार भाजप प्रवेश करतील. गोवा विधानसभेत सध्या काँग्रेसचे अकरा आमदार आहेत. लोकमतला प्राप्त माहितीनुसार सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस वगळता काँग्रेसचे दहा आमदार माझे प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. पक्षांतर बंदी कारवाई टाळण्यासाठी दोन तृतीयांश आमदार फुटीची आवश्यकता आहे. आठ आमदार पुरेसे होते, परंतु येथे ११ पैकी १० आमदार भाजपप्रवेशाच्या तयारीत आहेत.

जुलै २०१९ ची पुनरावृत्ती पुन्हा एकदा गोव्यात होणार आहे. २०१९ मध्ये बाबू कवळेकर हे विरोधी पक्ष नेते असताना सोबत नऊ आमदारांना घेऊन भाजपात गेले होते. त्यावेळी काँग्रेसचे १५ आमदार विधानसभेत होते. पंधरापैकी दहा आमदार फुटले होते.

लोबो यांच्यासोबत भाजप प्रवेशाच्या तयारीत दिलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. भाजप प्रवेशानंतर त्यांना राज्यसभेवर स्थान दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गोवा फॉरवर्डशी युतीने काँग्रेसने निवडणूक लढवली होती गोवा फॉरवर्डचा एक आमदार विधानसभेत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here