मुंबई,दि.6: शिक्षण क्षेत्राला कलंक लावलेल्या तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तगडा झटका दिला आहे. बेहिशेबी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमविल्याप्रकरणी तीन शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. लाचखोरी करत शिक्षण क्षेत्राला कलंक लावलेल्या माजी शिक्षणाधिकारी असलेल्या किरण लोहार, तुकाराम सुपे आणि विष्णू कांबळे विरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
किरण लोहार, सुपे, कांबळे विरोधात गुन्हा दाखल
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तुकाराम नामदेव सुपे (वय 59, तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे, (सध्या सेवा निवृत्त) रा. रा.कल्पतरू, गांगर्डेर नगर,सुदर्शन हॉस्पिटल समोर, पिंपळे गुरव, पुणे) विष्णू मारुतीराव कांबळे (वय 59, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सांगली) त्याची पत्नी सौ. जयश्री विष्णू कांबळे (सर्व रा. शिवशक्ती मैदान पाठीमागे बारबोले प्लॉट, शिवाजीनगर, बार्शी जिल्हा. सोलापूर) आणि किरण आनंद लोहार (वय 50, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, पत्नी सुजाता किरण लोहार ( वय 44) मुलगा निखिल किरण लोहार (वय 25 सर्व रा. प्लॉट नं. सी. 2, आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकाचवेळी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील बहुधा ही पहिलीच वेळ आहे.
सांगली जिल्हा परिषदेकडील तत्कालीन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विष्णू मारूतीराव कांबळेच्या 82 लाखांच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणी सांगली लाचलुचपत प्रतिबंधककडून सांगलीच्या विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी पदावर असताना विष्णू मारूतीराव कांबळे यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या तसेच त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या बेहिशेबी मालमत्ताची तपासणी केली. त्यामध्ये कांबळे दाम्पत्याच्या नावे 82 लाख 99 हजार 952 रूपयांची बेहिशेबी असल्याचे स्पष्ट झाले. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 16 जून 1986 ते दि. 6 मे 2022 या कालावधीत कांबळे यांनी भ्रष्ट आणि गैरमार्गाने जमवलेल्या तसेच कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा बेहिशेबी मालमत्तांचे परीक्षण केले. त्यामध्ये बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कांबळे दाम्पत्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
किरण लोहारकडे बेहिशोबी मालमत्ता
दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहारकडे परिक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक 5 कोटी 85 लाख 85 हजार 623 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. पत्नी सुजाता, मुलगा निखिल लोहारने भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमा करण्यास सहाय्य केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे (MSCE) माजी आयुक्त तुकाराम सुपेवर 3.59 कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुपेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम सुपेला अटकही झाली होती. सध्या तो सेवानिवृत्त झाला आहे.