मुंबई,दि.11: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली. तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात? अशी जाहिरात भाजपने केली होती. काँग्रेसने या जाहिरीतवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. पक्षाची ही जाहिरात असल्याने बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. हेमंत करकरे यांचा मत्यू दहशतवादी कसाब याच्या गोळीने नाही तर संघ समर्थक असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने मारलेल्या गोळीने झाला होता असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले होते.
माजी पोलीस अधिकारी एस.एम.मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला देऊन त्यांनी हे विधान केले होते. या माध्यमातून त्यांनी भाजपा उमेदवार उज्ज्वल निकम यांना लक्ष्य करायचे होते. या प्रकरणी नागपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील आठवड्यात भाजपाकडून प्रमुख माध्यमांमध्ये दिलेल्या जाहिरातीत पाकिस्तानचा उल्लेख केला होता. तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात? अशी ती जाहिरात होती. याप्रकरणी काँग्रेसकडून तक्रार झाल्यानंतर आयोगाने ठाण्यात गुह्या दाखल केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.