वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल

0

सोलापूर,दि.२२: चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला पोलीस कोठडीत मारहाण केली तसेच त्याच्या आजारपणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तत्कालीन विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह सात पोलिसांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह श्यामराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार मारुती कोल्हाळ, पोलीस हवालदार श्रीरंग तुकाराम खांडेकर, पोलीस नाईक शिवानंद दत्तात्रय भीमदे , अंबादास बालाजी गड्डम, पोलीस शिपाई अतिश काकासाहेब पाटील, लक्ष्मण पोमू राठोड ( सर्व नेमणूक विजापूर नाका पोलीस ठाणे ) अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्रीशैल गजा यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी भीमा रज्जा काळे ( वय ४२, रा. पारधी वस्ती, कुर्डुवाडी, ता. माढा ) यास २२ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हा कारागृहातून न्यायालयाच्या परवानगीने सहायक पोलीस निरीक्षक कोल्हाळ यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयाकडून पोलीस कोठडी मंजूर करून घेतली होती.

पोलीस कोठडीत असताना आरोपी काळे याला सर्दी, ताप, खोकला व उलट्या होत होत्या. तसेच त्याच्या दोन्ही पायास संसर्गही झाला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचार सुरू असताना भीमा काळे याचा ३ ऑक्टोवर २०२१ रोजी मृत्यू झाला. दरम्यान, गुन्हा कबूल करावा तसेच चोरीतील माल काढून देण्यासाठी तपास अधिकारी कोल्हाळसह इतर पोलिसांनी त्याला पोलीस कोठडीत मारहाण केली होती.

विजापूर नाका पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी तपास अधिकाऱ्याला मार्गदर्शक सूचना दिल्या नसल्याचे चौकशीत आढळून आले. तसेच आरोपीच्या वैद्यकीय उपचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक जी. व्ही. दिघावकर हे करीत आहेत. गुरुवारी, विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here