जम्मू,दि.15: जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे एक प्रवासी बस चिनाब नदीच्या दरीत कोसळल्याने 36 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 13 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी बस किश्तवाडहून जम्मूला जात असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिस आणि इतर शासकीय यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे.
पोलिस नियंत्रण कक्ष डोडा येथील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “किश्तवाडहून जम्मूला जाणारी एक प्रवासी बस डोडा जिल्ह्यातील असर भागातील त्रंगलजवळ 250 मीटर खोल दरीत कोसळली. या घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू होण्याची भीती आहे.”
दोडापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या रगिनल्लाह अस्सारजवळ बस दरीत कोसळली. 50 हून अधिक लोक बसमध्ये असल्याची माहिती आहे. एसएसपी डोडा यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
डोडा जिल्ह्यातील त्रंगल अस्सारजवळ अससर येथे हा अपघात झाल्याची माहिती आहे. बुधवारी JK02 CN 6555 या क्रमांकाची बस किश्तवाडहून जम्मूकडे जात असताना त्रंगल अस्सारजवळ दरीत कोसळली. या अपघातात एकूण 50 लोक जखमी झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 36 प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान अपघातस्थळी मदतीसाठी धावलेल्या स्वयंसेवकांनी सांगितले की, “आम्हाला मृतांची नेमकी संख्या माहित नाही, परंतु आम्ही प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत, प्रवासी वाहनाजवळ अनेक मृतदेह रस्त्यावर विखुरलेले आहेत” अशी माहिती अबाबिलच्या एका स्वयंसेवकाने दिली आहे. मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.