मुंबई,दि.28: 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज सादर केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. शिंदे सरकारने शेतकरी आणि महिला वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांसाठी अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपये, ‘निर्मल वारी’साठी 36 कोटींचा निधी, 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना जाहीर करण्यात आली आहे.
महिलांना काय?
मध्य प्रदेशच्या लोकसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली योजना आता महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी आज ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची’ घोषणा केली. लाडकी बहिण योजनेतून 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये मिळणार आहेत. तसंच 25 लाख महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण देणार असून व्यावसायिक शिक्षणामध्ये 8 लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना 100% टक्के सवलत देण्याची घोषणा देखील करण्यात आलीय. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. त्याचप्रमाणे महिलांसाठी राज्यात 10 हजार पिंक रिक्षा देण्यात येतील, असं अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
शेतकऱ्यांसाठी काय?
शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये “गाव तिथे गोदाम योजना, कृषीक्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता वापर संशोधनासाठी 100 कोटी रुपये, 108 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता, 10 हजार हेक्टर खासगी जमिनीवर बांबू लागवड, मागेल त्याला सौरऊर्जा पंप या योजना,” या निर्णयांचा समावेश आहे.
‘मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनें’तर्गत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा, दुधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, नवी मुंबईत महापे येथे जेम्स अॅन्ड ज्वेलरी पार्कची निर्मिती, सिंधुदुर्ग येथे 66 कोटींच्या आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा डायव्हिंग केंद्राची निर्मिती, बारी समाजासाठी ‘संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळा’ची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली.