औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन, शिवसेना नेते संजय राऊत यांनी अकबरुद्दीन ओवेसींवर केला हल्लाबोल

0

मुंबई,दि.१३ः एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ओवेसीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरुन आता वादाला तोंड फुटले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओवेसींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. औरंगजेब हा काही साधू-संत नव्हता. महाराष्ट्रावर चाल करुन येणाऱ्याच्या कबरीवर तुम्ही दर्शनासाठी जात असेल तर एक दिवस तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल इतकं लक्षात ठेवा, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

“संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे हे महाराष्ट्राला अशांत करण्याचं राजकारण ओवेसी बंधू करत आहेत. महाराष्ट्रावर चाल करणारा २५ वर्ष रडत राहीला. त्याला कधीच यश मिळालं नाही. औरंगजेब काही साधू संत नव्हता. इतिहास तुम्हाला सगळं सांगेल. औरंगजेबाच्या कबरीवर महाराष्ट्राला आव्हान देण्याची गोष्ट तुम्ही करत असाल तर ते आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. जे औरंगजेबाचं झालं तेच त्याच्या भक्तांचंही होईल”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठीत सुरा खुपल्याचा आरोप केल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांनी काळजीपूर्वक विधानं केली पाहिजेत. महाविकास आघाडीला तडा जाईल असं काम करू नये असं सगळ्यांचं म्हणणं असल्याचं ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here