सोलापूर,दि.6: Solapur: राज्यात भोंग्यावरून (Loudspeaker Controversy) वातावरण तापलं आहे. भोंगे लावण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा विषय राज्यभर गाजत असताना सोलापूर शहरातील अनधिकृत प्रार्थनास्थळांचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.
प्रार्थनास्थळांवर लाऊडस्पीकर लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भोंगे लावण्यास परवानगी आहे. मात्र, हे भोंगे ज्या प्रार्थनास्थळांवर लावले जाणार आहेत त्या इमारती अधिकृत असल्या पाहिजेत. त्यांच्याकडे महापालिकेचा बांधकाम परवाना असला पाहिजे.
अनधिकृत प्रार्थनास्थळांबाबत उच्च न्यायालयाने पूर्वी आदेश दिले होते. महापालिकेने अशी प्रार्थनास्थळे नियमित करुन देण्याची प्रक्रिया राबवली होती. त्यावेळी अनेकांनी नियमितीकरण करुन घेतले. अद्याप ज्यांनी केलेले नाही आणि ज्यांना नियमित करुन घ्यायचे आहे, त्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली तर त्यांनाही नियमित करुन देण्यात येईल. सध्याच्या परिस्थितीत भोंगे लावण्यासाठी ही परवानगी सांगितले. आवश्यक आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
महापालिका प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. याला दुजोरा देताना आयुक्त म्हणाले, ज्यांची एकाच खात्यात तीन वर्षे पूर्ण झाली आहेत, अशांची बदली करण्यात येईल. याबाबतची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. महापालिका निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतीही सूचना अद्याप प्राप्त झालेली नाही. प्रभाग रचनेबाबतही आदेश नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील मुख्य रस्ते करण्याबाबतचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला आहे. त्यासाठीची तरतूदही अंदाजपत्रकात करण्यात आली असून या कामाची निविदा काढली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
वैद्यकीय कचरा गोळा करणाऱ्या मक्तेदाराची मुदत संपत आली असून नवीन निविदा काढण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. पार्क मैदानावरील क्रिकेट सामन्यांसाठी ठरवलेले दर योग्य असून यात बदल होणार नाही. मैदानाच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च लक्षात घेऊन हे दर ठरवले आहेत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.