नोएडा,दि.२०: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या आदेशानंतर नोएडात ६०२ मंदिरे आणि २६५ मशिदींना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ मे पर्यंत वेळ दिल्यानंतर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये भोंगे काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली. राज ठाकरेंच्या या भाषणामुळे महाराष्ट्रासह देशभरात या मुद्द्याला पुन्हा वाचा फुटली. गोवा, कर्नाटक, उत्तर प्रदेशात राज ठाकरेंच्या भाषणानंतर मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी विविध हिंदू संघटना पुढे आल्या. मात्र आता उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून योगी सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे.
मुख्यमंत्री योगी यांच्या आदेशानंतर नोएडात ६०२ मंदिरे आणि २६५ मशिदींना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मंदिर, मशिदी यांचा आढावा घेतला. त्यानंतर आता लाऊडस्पीकरच्या वापराबाबत नियमावली जारी करत कुठल्याही परिस्थितीत त्याचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ६२१ मंदिरांपैकी ६०२ मंदिरे, २६८ मशिदींपैकी २६५ मशिदी आणि १६ अन्य धार्मिक स्थळांच्या धर्मगुरू आणि कमिटीला नोटीस जारी केली आहे. हायकोर्टाने दिलेल्या ध्वनी प्रदुषणच्या रोखण्याच्या नियमांचे पालन करावं असं बजावण्यात आले आहे. आवाजाची मर्यादा ओलांडली तर त्यांच्यावर कारवाई होईल असंही पोलिसांनी सांगितले आहे.
त्याचसोबत नोएडा येथे आता धार्मिक जुलूस किंवा शोभायात्रा काढण्यासाठी सुरुवातीला प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. ज्यात कार्यक्रमात कुठल्याही प्रकारे भडकाऊ भाषण आणि प्रदर्शन होणार नाही. अथवा जर असे झाले तर दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी असं लिहिलं आहे. लाऊडस्पीकरवरून उत्तर प्रदेशातही वातावरण पेटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. योगी सरकारनं नियमावली जारी करत लाऊडस्पीकरच्या वापराबाबत लोकांना मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे.
नियमावली
माइक, साऊंड सिस्टमचा वापर केला जावा परंतु याचा आवाज धार्मिक परिसराच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी
आवाजाचा कुठलाही त्रास अन्य लोकांना होता कामा नये.
नवीन स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी घ्यावी.
कुठल्याही परवानगीशिवाय शोभायात्रा किंवा जुलूस काढू नये, परवानगी देण्यापूर्वी शांतता आणि सलोखा राखला जाईल यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल.
जे पारंपारिक सण, उत्सव आहेत किंवा धार्मिक यात्रा आहेत तेव्हाच परवानगी दिली जाईल. अनावश्यक कारणासाठी परवानगी दिली जाणार नाही.
मुस्लीम धर्मगुरूंनीही योगी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. रामनवमी आणि हनुमान जयंती यावेळी घडलेल्या हिंसाचारानंतर योगी सरकारनं आगामी उत्सावात कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेत आहे. कायदा सुव्यवस्था पाळण्यासाठी योगी सरकारनं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. त्यावेळी या नियमावलीचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.